डोंबिवली स्थानकातून बाहेर पडताना होणाऱ्या कोंडीमुळे चेंगराचेंगरी आणि वादावादीच्या प्रकारात वाढ; महापालिकेचे दुर्लक्ष

कल्याण डोंबिवली महापालिकेने डोंबिवली शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पादचारी पुलावर शेड उभारणीच्या कामास सुरुवात केली आहे. या कामामुळे पूर्वेकडील पादचारी पुलाचा भाग प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना गर्दीचा मोठा फटका बसत आहे. प्रवाशांमध्ये बाचाबाची आणि चेंगराचेंगरीचे प्रमाणही वाढत आहे.

डोंबिवली शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पूर्वेकडील पादचारी पुलावर टेन्साईल फॅब्रिक शेड उभारणीच्या कामास महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. या कामानिमित्त २२ डिसेंबपर्यंत हा पूल प्रवाशांना वाहतुकीसाठी बंद केला आहे. स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. या जिन्याच्या लगतच फळ व फूल विक्रेते ठाण मांडून बसले आहेत. याच भागातून भाजी मार्केट, सारस्वत कॉलनी, स्टेशन परिसरात जाणाऱ्या रिक्षांचा थांबा आहे. त्यामुळे सायंकाळी प्रवासी, वाहने आणि विक्रेते यांची कोंडी होत आहे.

गेले दोन तीन दिवस प्रवासी या अडचणींचा सामना करत असून अनेकदा प्रवाशांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग घडत आहे. रेल्वे स्थानकात गाडी आल्यानंतर तर या गर्दीत आणखी भर पडून चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रवाशांच्या वाटेवर ठिकठिकाणी अडथळे

रेल्वे स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अनुकूल हॉटेलजवळचा जिना नागरिकांना उतरावा लागतो. हा जिना अरुंद असून यावरून प्रवास करणे जिकिरीचे जात आहे. भाजी मार्केट, जोशी स्कूल, सारस्वत कॉलनी, पेंडसेनगर, मानपाडा रोड, निवासी विभाग आदी भागात जाणारे नागरिक याच पुलाचा वापर प्रवासासाठी करतात. याचबरोबर पूर्व व पश्चिमेला जाणाऱ्या प्रवाशांनाही रेल्वेच्या या पुलाचा वापर करण्याची परवानगी असल्याने येथे गर्दीचे प्रमाण हे नेहमीच जास्त असते. परंतु पुलावरून प्रवास करताना मानपाडा रोड, पाटकर रोड व फडके मार्गे विभागली जाणारी गर्दी ही आता अनुकूल हॉटेलजवळ एकवटत आहे. त्यामुळे सायंकाळी रेल्वे प्रवासी व इतर प्रवासी यांची झुंबडच या रेल्वेच्या जिन्यावर उडालेली पाहावयाला मिळत आहे.

पालिका प्रशासनाने गर्दीचा विचार करून पूल बंद करणे आवश्यक होते. स्टेशन परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असून प्रवाशांचे एकमेकांसोबत खटके उडत आहेत. पालिका प्रशासन व रेल्वेने विचारविनिमय करून ही गर्दी विभागण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना राबवायला हवी होती. शिवाय ठरलेल्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याकडे पालिकेने भर द्यावा. त्यांना सहकार्य करण्यास प्रवासी तयार आहेत.

लता अरगडे, रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी.

पादचारी पुलावर शेड उभारणी झाल्यावर प्रवाशांनाच त्याचा फायदा होणार आहे. परंतु कामाचा जेवढा कालावधी आहे तेवढय़ा कालावधीत ते काम प्रशासनाने पूर्ण करावे. जेवढे दिवस काम सुरू आहे त्या कालावधीत पूर्व-पश्चिमेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मधल्या पुलाचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी. यासाठी पालिकेने रेल्वे प्रशासनाशी चर्चा करावी, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे.

नम्रता शिंदे, प्रवासी