रवींद्रन यांच्याकडून डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराची पाहणी

डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले हटविण्यास फेरीवाला हटाव पथकाकडून टाळाटाळ केली जात आहे. काही पालिका कर्मचाऱ्यांचे फेरीवाल्यांसोबत साटेलोटे असल्याच्या तकारी आहेत. या तकारींची दखल घेत महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी सोमवारी रात्री साडे नऊ वाजता तसेच मंगळवारी दुपारी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात येऊन रस्त्यांची पाहणी केली. दरम्यान, आयुक्तांच्या या दौऱ्याची माहिती फेरीवाल्यांना आधीच मिळाली. त्यामुळे काही काळ हा परिसर फेरीवाला मुक्त झाला होता. आयुक्तांच्या दौऱ्यानंतर मात्र पुन्हा याच ठिकाणी फेरीवाले अवतरल्याचे चित्र होते.

‘फ’ प्रभागाकडून फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, आगरकर रस्ता परिसरात नियमित फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे या भागातील फेरीवाले ‘ग’ प्रभागाच्या हद्दीतील पाटकर रस्ता, रॉथ रस्ता, उर्सेकरवाडी, रामनगर रेल्वे तिकीट खिडकी, स्कायवॉकवर जाऊन व्यवसाय करतात. ग प्रभागात फेरीवाल्यांना हटविण्याचे काम अतिशय थंड आणि संथगतीने होत असल्याने पादचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानकातून प्रवाशांचा बाहेर पडण्याचा मुख्य मार्ग हा रामनगर, उर्सेकरवाडी, वाहतूक कार्यालय परिसर आहे.  या गर्दीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले असते, अशा पादचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. रामनगर भागातील काही ज्येष्ठ नागरिकांनी फेरीवाल्यांना हटविण्याबाबत एक निवेदन या भागातील आजी, माजी नगरसेवकांना दिले आहे. त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, अशा ज्येष्ठ मंडळींच्या तक्रारी आहेत. आयुक्त रवींद्रन यांनी मंगळवारी दुपारी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केल्यानंतर प्रभाग अधिकारी, फेरीवाला हटाव पथक प्रमुखांना एकही फेरीवाला रेल्वे स्थानक भागात दिसता कामा नये, असे आदेश दिले. त्यामुळे कर्मचारी मान मोडून फेरीवाल्यांना हटविण्याचे काम करताना रात्री उशिरापर्यंत दिसत होते.