कल्याण :  कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत २५ नोव्हेंबरनंतर ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची पालिकेने करोना चाचणी सुरू केली आहे. त्यात एक प्रवासी करोनाबाधित आढळून आला आहे. या प्रवाशाचा तपासणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीसाठी मुंबईतून पुणे येथील राष्ट्रीय संसर्गजन्य संस्थेकडे पाठविण्यात आला आहे. या प्रवाशाची प्रकृती स्थिर आहे, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत जे प्रवासी ब्रिटनमधून महाराष्ट्रात आले आहेत, त्यांची यादी राज्य सरकारने स्थानिक जिल्हा, पालिका प्रशासनांना पाठविली आहे. या प्रवाशांच्या करोना चाचण्या, त्यांच्यावर ठेवायची देखरेख आणि प्रवासी करोनाबाधित आढळून आला तर घ्यावयाची दक्षता याविषयीच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत.