कल्याण-डोंबिवली शहरात नोकरदार वर्ग अधिक असल्याने सकाळ-संध्याकाळ प्रवासासाठी त्यांना रिक्षाशिवाय पर्याय नसतो. प्रवाशांची ही गरज लक्षात घेऊन रिक्षाचालकांनी आपली मनमानी सुरू करण्यास सुरुवात केली. वाहतूक विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागाला न जुमानता या रिक्षाचालकांनी रेल्वे स्थानक परिसरातील मुख्य रस्ते, चौकात मनमानी पद्धतीने रिक्षा वाहनतळ निर्माण केले आहेत.
डोंबिवली पूर्व भागात ३७, डोंबिवली पश्चिमेत ५४, कल्याण पूर्व, पश्चिम भागात १०८ असे कल्याण-डोंबिवली शहरात एकूण १९९ रिक्षा वाहनतळ आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात १८ हजार रिक्षा आहेत. या रिक्षांसाठी १९९ रिक्षा वाहनतळ पुरेसे नाहीत. रिक्षा वाहनतळ सुरू करण्यासाठी रिक्षा संघटनांकडून वाहतूक, आरटीओ कार्यालयाला प्रस्ताव पाठविणे गरजेचे असते. तो प्रस्ताव आरटीओकडून मान्य झाल्यावर रिक्षा वाहनतळ सुरू केला गेला पाहिजे, अशी नियमावली आहे. हा नियम धाब्यावर बसवून अनधिकृत रिक्षा वाहनतळ चालकांकडून सुरू केले जात आहेत. सर्व रिक्षा संघटना राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्याने या वाहनतळांविरोधात कारवाई करण्याची हिंमत महापालिका आणि आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये नाही. रिक्षा संघटनेचे पदाधिकारी या विषयावर गप्प आहेत. रिक्षाचालकांची नाराजी ओढावून घेण्यापेक्षा अनधिकृत वाहनतळांचे समर्थन या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
कल्याण-डोंबिवलीतील रेल्वे स्थानक आणि बाजारपेठ परिसरातील मोक्याच्या जागा रिक्षा संघटनांनी रिक्षा वाहनतळांसाठी बळकावल्या आहेत. रेल्वे स्थानक आणि बाजारपेठा यांना रिक्षा वाहनतळांचा विळखा पडलेला दिसतो. डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील कल्याणच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाखालीच रिक्षा स्थानक आजही कार्यरत आहे. पालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. रिक्षाचालकांच्या संघटना या शिवसेनाप्रणीत आहेत. संघटनांच्या अध्यक्षांनी केलेल्या मागणीच्या आधारे बेकायदा रिक्षा वाहनतळांना नियम धाब्यावर बसवून मान्यता देण्यात सत्ताधाऱ्यांनी धन्यता मानली आहे. प्रशासनही नियमानुसार मान्यता न देता लोकप्रतिनिधींच्या राजकीय दबावाला बळी पडते.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील गल्लीबोळात, मुख्य रस्ते चौकात असलेले रिक्षांचे वाहनतळ बघून ही प्रवासी नागरिकांची सेवा आहे की रिक्षाचालकांनी केलेली वाहतूक कोंडी, प्रवाशांची कोंडी करण्यासाठी सुरू केलेला व्यवसाय आहे, असा प्रश्न पडतो.
– धनश्री गांगल, डोंबिवली

रस्त्यावर नियमबाह्य़ वाहन उभे केले की वाहतूक विभागाची टोइंग व्हॅन ते वाहन तात्काळ उचलून नेते. मग दररोज शेकडो रिक्षा डोंबिवली रेल्वे स्थानक भागात वाहनतळ सोडून उभ्या असतात. त्यांच्यावर वाहतूक विभाग, आरटीओ विभागाकडून कारवाई का केली जात नाही?
– संदीप ढवळे, डोंबिवली