विद्यार्थी वाहतुकीसाठी शासनाने आखून दिलेल्या चौकट आणि नियमांना डावलून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे.

रिक्षा, ओमनी वाहनांमधून या विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून नेले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यासंबंधी वाहन चालक तसेच मालकांवर सोमवारी सकाळी डोंबिवलीत कारवाई करण्यात आली. सकाळी साडे सहा वाजता सुरू झालेल्या या कारवाईमुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची पळापळ झाली. नियमबा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांना दंड ठोठावण्यात आला. कल्याण, डोंबिवली शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेली सुमारे १०० खासगी वाहने विद्यार्थी वाहतूक करतात. ही वाहतूक ओमनी वाहन, रिक्षांमधून केली जाते. या वाहनांमधून किती विद्यार्थी वाहतूक करावी यावर मर्यादा आहे. अनेक वाहन चालक या वाहनांत कोंबून विद्यार्थी भरतात. भरधाव चालक वाहने चालवितात, अशा तक्रारी कल्याण ‘आरटीओ’ कार्यालयाकडे आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, साहाय्यक अधिकारी आय. एस. मासुमदार व ‘ईगल ब्रिगेड’चे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी कारवाई सुरू केली.