गुलाब वझे अध्यक्ष, आगरी युथ फोरम

ठाण्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घडामोडींचे एक केंद्र, मराठी माणसाचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या डोंबिवलीत यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. गेली अनेक वर्षे डोंबिवलीकर साहित्य संमेलनाची प्रतीक्षा करीत होते. अखेर तो योग जुळून आला आहे. येथील आगरी युथ फोरमला संमेलनाचे यजमानपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी आगरी युथ फोरम सज्ज झाले आहे. यानिमित्ताने या संमेलनाचे स्वरूप आणि तयारीविषयी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्याशी साधलेला संवाद..

  • साहित्य संमेलनाचे आयोजन करावे असे का आणि कधी वाटले?

आगरी युथ फोरमच्या वतीने गेली बारा वर्षे आगरी महोत्सव भरविला जात आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आगरी समाजामध्ये विविध विषयांवर चर्चासत्र घेऊन सामाजिक प्रबोधन करण्याचे काम आम्ही करत आहोत. या महोत्सवात अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावून त्यांचे विचार मांडले आहेत. साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगांवकर, शं.ना.नवरे, बाबासाहेब पुरंदरे, बाबा आमटे, मंदाताई आमटे आदी सर्वाच्या व्याख्यानाने आम्ही प्रेरित झालो होतो. आपण वाचन तर करत असतोच, परंतु साहित्याचे वाचन हे वेगळे असून त्याची गोडी आम्हाला आगरी महोत्सवातील या मान्यवरांच्या विचारांमुळे लागली. आमच्या विचारांना दिशा मिळाली. शिवाय आगरी समाज नानासाहेब व अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निरुपणामुळे अध्यात्माकडे जास्त वळला असे म्हणावयास हरकत नाही. त्यातच ९व्या आगरी महोत्सवामध्ये विश्वास पाटील यांची मुलाखत होती. यावेळी येथील शिस्तबद्धता, व्यवस्था आणि कार्यक्रमाची रूपरेषा पाहून तुम्ही साहित्य संमेलन का घेत नाही असे त्यांनी विचारले, तेव्हा पहिल्यांदा डोक्यात साहित्य संमेलन भरवावे, हा विचार मनात आला.

  • साहित्य संमेलनासाठी कोणाच्या गाठीभेटी पत्रव्यवहार केलेत?

डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे हे आपण सर्वच जाणतो. शिवाय या नगरीला मोठमोठय़ा साहित्यिकांचा वारसाही लाभला आहे. त्यामुळे आपण डोंबिवलीत साहित्य संमेलन व्हावे यासाठी प्रयत्न करूया असे आमच्या सर्वच कार्यकर्त्यांना वाटू लागले. त्यासाठी मग साहित्य संमेलन कसे होते, काय असते हे जाणून घेण्यासाठी प्रथम आम्ही सासवड येथील साहित्य संमेलनाला गेलो. तेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना डोंबिवलीत संमेलन घेण्याची संधी द्या असे निवेदन दिले. त्यानंतर घुमान येथेही आम्ही गेलो. गेल्या वर्षी डोंबिवलीतील जागांची पाहणी करण्यासाठी महामंडळाचे पदाधिकारी डोंबिवलीत आले होते. मात्र त्यावेळेसही पिंपरी चिंचवडला मान मिळाला. आम्ही या तिन्ही ठिकाणच्या साहित्य संमेलनाला हजेरी लावून अरुण म्हात्रे, रविप्रकाश कुलकर्णी आदी सर्वाच्या भेटीगाठी घेऊन डोंबिवलीमध्ये एक संधी द्या अशी मागणी करीत होतो. त्यांनीही त्यावेळेस आम्हाला शब्द दिला होता की डोंबिवलीमध्ये नक्कीच साहित्य संमेलन भरवू, त्यानुसार यंदा ते पाहणीसाठी आले आणि त्यांना येथील जागा पसंत आल्याने चौथ्या प्रयत्नात आपल्याला यश आले.

  • साहित्य संमेलनासाठी किती निधीची आवश्यकता आहे, निधीची जमवाजमव कशी करणार आहात, आगरी महोत्सवाच्या उद्देशातून जमा होणारा निधी येथे वापरणार आहात का?

कल्याण डोंबिवली महापालिका, राज्य शासन आपल्याला निधीमध्ये काही स्वरूपात मदत करणार आहेत. डोंबिवलीतील साहित्य संमेलनासाठी साधारण ५ कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज आहे. त्यासाठी आगरी युथ फोरमच्या माध्यमातून काही निधी, आणि इतर समाजातील दानशूर संस्था, व्यक्ती यांचीही मदत घेण्यात येईल. महाविद्यालयासाठी जागा मिळावी, त्यासाठी निधी संकलित व्हावा म्हणून आगरी महोत्सव भरविण्यात येतो. त्यानुसार आतापर्यंत काही निधी जमा झाला असून त्यातील निधीही गरज पडल्यास साहित्य संमेलनासाठी खर्च करण्यात येईल.

  • काही साहित्यिक, संस्था नाराज आहेत त्यांना कसे सामावून घेणार आहात?

साहित्य संमेलनासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो, त्याचे यजमानपद आम्हाला मिळाले आहे. मात्र हे केवळ आगरी युथ फोरमचे साहित्य संमेलन नसून कल्याण डोंबिवली दोन्ही शहरांचे आहे हा विचार सर्वानी करून आमच्या सोबत यावे. आमचा संपर्क कमी असल्याने आम्ही यापूर्वी सर्वाशी संपर्क करू शकलो नाही. मात्र येत्या ९ ऑक्टोबरला सर्वेश सभागृहात एक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या हरकती सूचना सुचवाव्यात. सर्वाना सोबत घेऊनच हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्याचा आमचा मानस आहे.

  • साहित्य संमेलनात आगरी समाजाचे काही स्वतंत्र स्थान असेल का? भाषेच्या प्रसारासाठी काय करणार आहात?

आगरी भाषा ही एक वेगळी भाषा असून आगरी भाषेतील साहित्यही पुढे येऊ लागले आहे. आता आगरी साहित्य संमेलनही काही ठिकाणी भरविले जाते. त्या साहित्यिकांना, तेथील आयोजकांना यंदाच्या साहित्य संमेलनात सहभागी करून घेणार आहोत. या समाजातील तरुणही साहित्यावर अभ्यास करत आहेत, काही लेखक, कवी झाले आहेत. अंबरनाथ येथील डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांनी आगरी भाषेच्या व्याकरणावर पीएच.डी. केली आहे. त्यांच्या त्याविषयावरील संशोधनाचा मुंबई विद्यापीठातर्फे सवरेत्कृष्ट प्रबंध म्हणून गौरवही झाला आहे. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. एकूणच साहित्य संमेलनात आगरी बोली आणि रीतिरिवाजांविषयी माहिती देण्याची योजना आहे.

  • साहित्य संमेलनाची तयारी कशी असेल?

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर डोंबिवलीतील साहित्य संमेलनाची तयारी केली जाईल. कोणतीही कमतरता जाणवणार नाही याचा आम्ही पुरेपूर विचार करत आहोत. रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, रेल्वे स्थानकावरून यायचे झाले तर कसे यायचे याविषयी माहितीफलक, मंच उभारणी, मान्यवरांच्या राहण्याची व्यवस्था, जेवण आदी सर्व गोष्टींचा नीट विचार सुरू आहे. यासाठी महापौर, पालिकेचे अधिकारी, परिवहनचे सभापती, वाहतूक विभागाचे अधिकारी, पोलीस, रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरच नियोजनाची रूपरेषा आखली जाणार आहे.

  • साहित्य संमेलनाचा ठराव काय असेल?

अद्याप यावर काहीही बोलणे झालेले नाही, सध्या संमेलनाची मंडळी ही अध्यक्षीय मतदानामध्ये व्यस्त आहेत. अखंड महाराष्ट्रालाच आमचा पाठिंबा असून, मराठी वाङ्मयाच्या प्रचार आणि प्रसारासाठी काय ठोस उपाययोजना करता येतील, याविषयी एखादा ठराव मांडण्याचा आमचा विचार सुरूआहे. यासोबतच स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी यांच्या समस्यांकडे लक्ष वेधणार आहोत.

  • संमेलनाची तारीख कधीपर्यंत निश्चित होईल?

सध्या सर्व जण संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तयारीत गर्क आहेत. संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर दोन महिन्यांच्या कालावधीत संमेलन पार पडते. येत्या ११ डिसेंबरला संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.  त्यानंतर कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आखली जाणार आहे. साधारण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात संमेलन होऊ शकते. त्यापुढे दहावी बारावीच्या परीक्षा असल्याने त्यापेक्षा अधिक उशीर करून चालणार नाही.