डोंबिवलीतील नांदिवली येथील नाल्यात दोन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. हर्षल जिमकल असे या तरुणाचे नाव असून त्याला वाचवण्यासाठी आणखी एका तरुणाने उडी मारली. मात्र, पाण्याच्या प्रवाहात दोघेही वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

मंगळवारी ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले होते. यामुळे नांदिवलीतील नाला दुथडी भरुन वाहत होता.  या नाल्यात हर्षल जिमकल हा तरुण वाहून गेला. हर्षल  वाहून जात असल्याचे बघून एका तरुणाने नाल्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की दोघेही वाहून गेले. बुधवारी पावसाचा जोर ओसरला असून अग्निशमन दलाचे पथक दोघांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, कल्याण, डोंबिवली शहरात जागोजागी झालेली बेकायदा बांधकामे गटारे, रस्ते, नाल्यांना अडथळा ठरली आहेत. २७ गाव भागातील शिळफाटा, नांदिवली, आयरे, कोपर पूर्व, भोपर, स्वामी समर्थ मठ, सोनारपाडा, मानपाडा, नेवाळी, काटई परिसरातील रस्ते माफियांनी पाणी वाहून जाण्याच्या मार्गात बांधलेल्या चाळी, बेकायदा इमारत परिसर जलमय झाला होता.