धुराच्या लोटामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला आता कचराभूमीला आग लागण्याच्या समस्येने ग्रासले आहे. बुधवारी आधारवाडी कचराभूमीला लागलेली आग अद्यापही धुमसत असून रविवारी वाऱ्याचा जोर वाढल्याने आगीने पुन्हा रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या तीन गाडय़ा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. आधारवाडी येथील कचराभूमीला वारंवार आगी लागण्याच्या घटना घडत असून, या आगीवर पूर्णपणे नियंत्रण कसे मिळवावे हाच प्रश्न महापालिका प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
कचराभूमीवरील आग धुमसत राहू नये. ती आटोक्यात यावी यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कचराभूमीवर माती टाकण्याचा निर्णय घेतला असून याचा प्रस्तावही पालिकेला सादर केला आहे. परंतु, अद्याप त्यावर काही ठोस निर्णय झालेला नाही. रविवारी आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांना खोकल्याचा, डोळे चुरचुरण्याचा त्रास होत आहे.