डोंबिवलीजवळील कोळेगाव येथे दोन मैत्रिणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. ऋतुजा कोल्हे (वय १४) आणि वर्षा पाटील (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. तर कल्याणमध्ये एका डॉक्टर महिलेने आठव्या मजल्यावरुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येच्या या घटनांनी डोंबिवली- कल्याण हादरले आहे.

डोंबिवलीजवळील कोळेगाव येथील श्री समर्थ कृपा या सोसायटीमध्ये चिंतामणी पाटील राहतात. त्यांच्या घरी ऋतुजा आणि तिचा भाऊ हे दोघे दररोज झोपायला जायचे. ऋतुजा आणि वर्षा यांच्यात वयाचे अंतर जास्त असले तरी त्या चांगल्या मैत्रिणी होत्या, असे स्थानिक सांगतात. मंगळवारी सकाळी ऋतुजाचा भाऊ वर्षाच्या खोलीत गेला असता त्याला ऋतुजा आणि वर्षा या दोघांनी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसले. त्याने याची माहिती चिंतामण पाटील यांना दिली. या दोघींनी एकाच ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केली असून या दोघींनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहे.

डोंबिवलीत आत्महत्येची घटना उघडकीस येत असतानाच कल्याणमधील खडकपाडा येथे डॉ. प्राजक्ता कुलकर्णी या विवाहितेने मंगळवारी सकाळी आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. प्राजक्ता या खडकपाडा येथील महावीर हाईट्स या इमारतीत राहतात. प्राजक्ता यांचा विवाह डॉ. प्रणव कुलकर्णी यांच्याशी झाला असून या दाम्पत्याला दोन मुले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून दोघेही महावीर हाइट्स सोसायटीत राहत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.