डोंबिवलीतील तीन परिचारिकांचा पूल दुर्घटनेत मृत्यू

मुंबईत सीएसएमटी येथे गुरुवारी झालेल्या पूल दुर्घटनेत डोंबिवलीतील तीन परिचारिकांवर काळाने घाला घातला. त्यांच्या मृत्यूमुळे तिन्ही कुटुंबांचे आधार कोलमडून पडले आहेत. घरातील वृद्ध मंडळी, शाळेत जाणारी मुले, पती अशा कुटुंबाचा गाडा हाकणारी आणि आर्थिक बाजूही सांभाळणारी आई, सूनबाई, मुलगी आता घरी परतणारच नाही, या कल्पनेने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरच शोकाकुल झाला.

अपूर्वा प्रभू या डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील उदयराज इमारतीत राहात. त्यांचा मुलगा गणेश सातवीत तर मुलगी चिन्मयी पाचवीत आहे. पती अंधेरी येथे एका जाहिरात एजन्सीत नोकरी करतात. अपूर्वा यांच्या सासूबाई ७० वर्षांच्या आहेत. अपूर्वा ठाकूरवाडी भागात ‘डॉक्टर’ म्हणून ओळखल्या जात. परिसरात कोणीही आजारी पडले, तर त्या स्वत त्यांच्या घरी जाऊन उपचार, मलमपट्टी करत, असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. जानेवारीमध्येच त्यांना शासनाचा ‘उत्कृष्ट परिचारिका’ पुरस्कार मिळाला होता. आता मुलांच्या परीक्षा सुरू होणार असल्याने त्या सुट्टीचे नियोजन करत होत्या.

रंजना तांबे (४०) या डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगरमधील कृष्णाई सज्जन दर्शन गृहसंकुलात राहात. त्यांना तीन विवाहित बहिणी आणि धर्मेद्र हा भाऊ आहे. त्यांचा भाऊ गरिबाचावाडा येथे राहतो. रंजना अविवाहित होत्या. त्यांच्या पायाला अपंगत्व आले होते. गणेशनगरमध्ये त्या आईबरोबर राहात. आईला त्यांचा मोठा आधार होता, असे त्यांच्या परिचितांनी सांगितले.

भक्ती शिंदे (४०) डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ क्रॉस सोसायटीतील ओम साई दत्त इमारतीत राहात. त्यांचे पती नोकरी करतात आणि मुलगा ओंकार आठवीत आहे. भक्ती या कुटुंबाचा मोठा आधार होत्या. मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालयात त्या अनेक वर्षे परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.

या तिन्ही महिलांचा ऐन उमेदीत मृत्यू झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक शोकाकुल झाले आहेत. मृत्यूची बातमी पसरताच डोंबिवलीवर शोककळा पसरली. नातेवाईकांसह स्थानिक नगरसेवक, कार्यकर्ते त्यांच्या घरी जमले होते. मृतांचे कुटुंबीय रात्रभर रुग्णालयात होते. सकाळी नऊ वाजता परिचारिकांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवासही एकत्र

रंजना, अपूर्वा आणि भक्ती जी. टी. रुग्णालयात परिचारिका होत्या. त्या डोंबिवलीतून एकाचवेळी, एकाच लोकलने प्रवास करत. घरीही एकत्रच येत असत. गुरुवारी तिघींची रात्रपाळी होती. कल्याणमध्ये राहणारे आणि जी. टी. रुग्णालयात अतिदक्षता विभागात काम करणारे भागवत हे देखील त्यांच्याबरोबर होते. लोकल प्रवास संपल्यावर हे सर्वजण पुलावरून रुग्णालयाच्या दिशेने जात असताना पूल आणि त्याबरोबर या तिघीही कोसळल्या. जखमी भागवत यांनी मदतकार्य करणाऱ्या जवानांना तीन परिचारिका आणि ते स्वत: जी. टी. रुग्णालयाचे कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना त्या रुग्णालयात नेण्यात आले.