राज्यमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा
शिवसेनेने नेहमी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण केले आहे. मराठी माणसांमध्ये स्वाभिमान निर्माण करून चांगले कार्यकर्ते घडविले. भाजपाने गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला संपवण्याचे काम केले. गोव्यात जे घडले तशी परिस्थिती महाराष्ट्रात शिवसेनेवर येता कामा नये. शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला आक्रमक पद्धतीने उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचा इशारा राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.
शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी डोंबिवली पूर्वेतील आयरे भागास भेट दिली या वेळी ते बोलत होते. मराठी माणसात स्वाभिमान निर्माण करण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती व्हावी अशी शिवसेना नेत्यांची इच्छा होती. मात्र, भाजप नेत्यांनी आडमुठी भूमिका घेतली. युती का झाली नाही याचा सविस्तर अभ्यास करायला हवा तसेच यामागील खरे सूत्र सर्वसामान्यांनी लक्षात घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढली जात आहे, राज्य पातळीवरची नाही. हे स्थानिक राजकारण असून महासत्तेचे राजकारण नाही. शिवसेनेने मराठी माणसांच्या रक्षणाचे काम केले. यापुढेही शिवसेनाच हे करू शकेल. मराठी माणसांना नोक ऱ्याही शिवसेनेने दिल्या आहेत. त्या वेळी भाजपा कोठे होता, असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. येथील मतदारांमध्ये उत्साह कायम असून ठाकरे कुटुंबावर सर्वाचा विश्वास आहे. या विश्वासावर येथील जनता शिवसेनेला विजयी करेल असेही ते म्हणाले.