मध्य रेल्वेचा प्रवाशांना अजब सल्ला; प्रवाशांमध्ये नाराजी
दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे उपनगरीय रेल्वे प्रवास अक्षरश नकोसा होत असतानाच या गर्दीवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने अवजड बॅग घेऊन प्रवास टाळा असा अजब सल्ला प्रवाशांना देण्यास सुरुवात केली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर विशेषत ठाण्याच्या पलीकडे गर्दीच्या वेळेत लोकल गाडीत मुंगी शिरायलाही जागा नसते. त्यामुळे लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. गर्दीवर उतारा म्हणून गाडय़ांच्या संख्येत वाढ करावी अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत असते. असे असताना पाठीवरच्या अवजड बॅगेमुळे सहप्रवाशांना त्रास होऊ शकतो, असे कारण पुढे करत रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या स्थानकांमध्ये पाठीवरून अवजड बॅग घेऊन प्रवास करू नका, अशा संदेशांची उद्घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बाहेरगावी जाण्यासाठी महत्त्वाची स्थानके गाठताना अवजड बॅगांची वाहतूक नेमकी कशी करायची असा सवाल आता प्रवासी विचारू लागले आहेत.
नोकरदार वर्गासाठी रेल्वे प्रवासादरम्यान बॅग हा अविभाज्य घटक असतो. या बॅगामध्ये जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, लॅपटॉप, पुस्तके आणि महत्वाची कागदपत्रे यांचा समावेश असतो. प्रत्येकाकडील बॅगांचे आकार कमी जास्त असले तरी कामावर जाताना पाठीवर बॅग अडकवून प्रवास करणे कधीही सोयीचे ठरते. गेल्या काही काळात बॅगांच्या वाढलेल्या आकारामुळे रेल्वे प्रवासात अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी काही प्रवाशांनी सुरू केल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावर गर्दीच्या स्थानकांमध्ये काही सामाजिक संस्थांनी यासंबंधी जनजागृती करून सहप्रवाशांना बॅगांचा त्रास होऊ नये यासाठी मोहिमा सुरू केल्या आहेत. या जनजागृती मोहिमेत आता रेल्वे प्रशासनानेही सक्रिय सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानकातील उद्घोषणांच्या माध्यमातून प्रवास करताना नोकरदार वर्गाला अवजड बॅग वापरू नका असा संदेश दिला जात आहे. रेल्वेच्या या उद्घोषणेवर रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांच्या बॅगा खूपच अवजड असल्याने सहप्रवाशांना त्रास होतो. त्यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण होते. या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या स्थानकांवर गेल्या दोन आठवडय़ांपासून अवजड बॅगा घेऊन प्रवास टाळण्याची उद्घोषणा देण्यास सुरुवात केली आहे.
– नरेंद्र पाटील, जनसंपर्क
अधिकारी, मध्य रेल्वे