निविदा काढूनही कंत्राटदारांची पाठ

मीरा-भाईंदर महापालिकेच्या क्रीडासंकुलाच्या सदस्यत्वासाठी निश्चित करण्यात आलेल्या शुल्कात संकुल चालविणे परवडत नसल्याने या संकुलाकडे कंत्राटदारांनी चक्क पाठ फिरविली आहे. आतापर्यंत तीन वेळा निविदा काढूनही एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. कंत्राटदाराअभावी क्रीडासंकुलाची वास्तू धूळ खात उभी असून अजून काही काळ तरी खेळाडूंसाठी संकुलाचे दरवाजे बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्रीडासंकुलाचे धोरण ठरल्यानंतरही कंत्राटदार नेमण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली होत नसल्याने होतकरू खेळाडू मात्र क्रीडासंकुलापासून वंचित राहात होते. ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये याबाबत सविस्तर वृत्त छापून आले. या वृत्ताची दखल घेऊन राजकीय पक्षांनी क्रीडासंकुलासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने हालचाल करून कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा काढली; परंतु आतापर्यंत तीन वेळा निविदा काढूनही एकदाही निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक अनुभवी कंत्राटदारांनी प्रशासनाशी संपर्क साधला; परंतु उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही, असे लक्षात आल्यानंतर कंत्राटदारांनी काढता पाय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्रीडासंकुलातील मैदान इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येणार नाही, अशी अट निविदेमध्ये समाविष्ट केली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला लग्नकार्यासाठी अथवा इतर खासगी समारंभासाठी देता येणार नाही. दुसरीकडे निव्वळ संकुलातल्या विविध खेळांसाठी निश्चित करण्यात आलेल्या शुल्काच्या जोरावर संकु लाचा गाडा हाकणे न परवडणारे आहे, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्याने निविदा भरण्यास कंत्राटदार पुढे येत नाहीत. त्यामुळेच संकुल चालविण्याच्या आता प्रशासनाकडून पुन्हा नव्याने निविदा काढण्याची तयारी करण्यात येत आहे.

वास्तू धूळ खात

क्रीडासंकुलाचे माजी केंद्रीय शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले; परंतु त्यानंतर दीड वर्षे कोणतीही हालचाल न झाल्याने क्रीडासंकुलाची वास्तू धूळ खात पडून आहे. परिणामी खेळाडू आणि नागरिकांना त्याचा वापरच करता येत नव्हता. अखेर यंदाच्या जुलै महिन्यात क्रीडासंकुलासाठी धोरण निश्चित करण्यात आले. संकु लाची देखभाल करण्यासाठी पालिकेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने अनुभवी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेऊन संकुलातील जलतरण तलाव, व्यायामशाळा, बॅडमिंटन, कॅरम आदी खेळांसाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे.