ठाणे येथील वर्तकनगर परिसरातील ‘दोस्ती’ या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्प योजनेतील इमारतींमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची गंभीर बाब पाण्याची टाकी साफसफाई करताना महापालिकेच्या निदर्शनास आली आहे. या टाकीमध्ये दूषित पाणी येणाऱ्या गळतीच्या भागाचा शोध घेऊन महापालिका प्रशासनाने त्याची तातडीने दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीनंतरही टाकीमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून या तपासणी अहवालानंतरच हे पाणी पिण्यास योग्य आहे का, हे स्पष्ट होणार आहे. तसेच या टाकीमध्ये पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य टाकीची साफसफाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांत पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती कोसळल्याने बेघर झालेल्या रहिवाशांचे ‘दोस्ती’च्या भाडेतत्त्वावरील योजनेतील घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या इमारतींना पाणीपुरवठा करणाऱ्या एका टाकीची साफसफाई महापालिका प्रशासनाने आठवडाभरापूर्वी हाती घेतली होती. त्या वेळी या टाकीमध्ये दूषित पाणी मिसळले असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे दूषित पाणी टाकीत मिसळणाऱ्या गळतीचा भाग शोधून प्रशासनाने त्या भागाची तातडीने दुरुस्ती केली आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेमार्फत टाकीमध्ये होणारा पाणीपुरवठा बंद करावा लागणार असून त्यामुळे इमारतींमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने टाकी सफाईसाठी वेगळे नियोजन आखले आहे. त्यानुसार, महापालिकेमार्फत मुख्य टाकीमध्ये होणारा पाणीपुरवठा दुसऱ्या टाकीमध्ये वळविण्यात येणार आहे. यामुळे इमारतींचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे.

खडकपाडय़ात कृत्रिम पाणीटंचाई

कल्याण : कल्याण पश्चिमेतील नागरीकरण झालेल्या खडकपाडा भागात आठवडय़ातून चार दिवस पालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चार दिवस पाण्यावाचून काढावे लागणार या भीतीने रहिवासी दीड हजार रुपये मोजून टँकरने पाणी आणून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. वारंवार हा प्रकार होत असल्याने केवळ टँकर लॉबीचे हित साधण्यासाठी या मध्यमवर्गीयांच्या वस्ती असलेल्या भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. पालिकेचा पाणीपुरवठा दर गुरुवारी बंद असतो. पालिकेत ३४५ रुपये भरून टँकरची मागणी केली तर पालिकेचा टँकर येण्यास एक ते दोन दिवस लागतात. या टँकरला शहराच्या विविध भागांत मागणी असते. तर काही टँकर चालक वाढीव पैसे देईल त्याला तात्काळ टँकर पुरवण्याची व्यवस्था करतात, असे रहिवाशांनी सांगितले.

कल्याणमध्ये आठवडाभर गढूळ पाणी

प्रतिनिधी, डोंबिवली

कल्याण पश्चिमेतील संतोषीमाता रोड कमल मोटर्सजवळ गेले काही दिवस भुयारी गटाराचे काम सुरू आहे. या कामामुळे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळले जात असल्याने रामबाग लेन नं. २ येथील भुजबळवाडी परिसरातील रहिवाशांना गेला आठवडाभर गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.

नागरिकांच्या घरातील नळांतून अनेकदा गांडूळही आल्याचे आढळून आले आहेत. रहिवाशांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या. पालिकेचे कर्मचारी येतात व तात्पुरती दुरुस्ती करून निघून जातात. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी येथील रहिवाशांची इच्छा आहे. सांडपाण्याच्या वाहिनीचे काम करण्यासाठी मोठा खड्डा खणण्यात आला आहे. त्या खड्डय़ामध्ये प्रवासी प्रवास करताना पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आम्हाला स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा महापालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी इच्छा रहिवाशांनी व्यक्त केली. सध्या येथील रहिवासी पिण्यासाठी एकतर विकतचे किंवा इतर विभागातील पाणी आणत आहेत. मात्र असे किती दिवस चालणार, असा त्यांचा संतप्त सवाल आहे.

गेले आठवडाभर आम्हाला गढूळ पाणीपुरवठा होत आहे, यामुळे रहिवाशांना पोटदुखी किंवा अन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. सांडपाणी वाहिनीचे काम अद्याप सुरू असून पालिका प्रशासनाने ते लवकरात लवकर पूर्ण करावे. येथील रहिवाशांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होईल याकडे लक्ष द्यावे, इतकीच आमची अपेक्षा आहे. मात्र पालिका प्रशासन आमच्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.

-संजय मोरे, रहिवासी