परिमंडळ चारमध्ये मोडणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरात बंदूकधारकांची संख्याही वाढली आहे. पाच वर्षांत परवाना असलेल्याबंदूकधारकांची संख्या २८९ वरून थेट ५८२ वर गेली आहे. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळातही अनेक बेकायदा बंदूक बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

वाढदिवसांच्या कार्यक्रमामध्ये बंदुकीतून हवेत गोळ्या झाडण्याचा प्रकार अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात नुकताच समोर आला असून यामुले अतिउत्साही शस्त्रधारकांमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे अशा शस्त्रधारकांना रोखण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरांचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांत बदलला आहे. या भागाचे झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. त्याचसोबत येथे गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. तसेच परिमंडळ चारमध्ये येणाऱ्या उल्हासनगर शहरातही गुन्हेगारीचा आलेख वाढताच आहे.

पोलीस दलात असलेले अपुरे मनुष्यबळ आणि वाढलेले गुन्हे यातही तफावत असल्याने गुन्हेउकल होण्याची संख्याही कमी आहे. त्यात अंबरनाथमधील द्वारली येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परवानाधारक बंदुकीच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात हवेत गोळ्या झाडणे हे प्रतिष्ठेचे मानले जात असल्याने वाढदिवस, हळदीच्या कार्यक्रमात असे प्रकार घडताना दिसतात. अंबरनाथमध्येच दोन वर्षांपूर्वी असा प्रकार समोर आला होता. त्यामुळे परवाना असलेल्या बंदूकधारकांवर नियंत्रण ठेवायचे कसे, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनीही हालचाली केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

परवान्यासाठी अर्ज वाढले

गेल्या काही वर्षांत बंदूकच्या परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे दिसून आले आहे. यात राजकारणी, नेते आणि लोकप्रतिनिधींचे नातेवाईक, बांधकाम व्यावसायिक, जमीनदारांची संख्या मोठी असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.