|| ऋषिकेश मुळे

प्रायोजकत्व शोधताना विद्यार्थ्यांची दमछाक; आर्थिक गणित बिघडल्याने उद्योजक, व्यापाऱ्यांचा आखडता हात :- दिवाळी सरताच महाविद्यालयांना वेध लागतात ते महोत्सवांचे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत विविध महाविद्यालयांत होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन, महाविद्यालयांतील महोत्सवांची लगबग सुरू होते. यंदा मात्र हे चित्र काहीसे निराशाजनक दिसत आहे. बाजारात विविध कारणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मरगळीचा परिणाम या महोत्सवांच्या आर्थिक गणितांवरही दिसू लागला आहे.  महाविद्यालयीन महोत्सवासाठी प्रायोजकत्व देण्यास बाजारपेठेत विविध कंपन्या, उद्योजक यांच्यामध्ये मोठी अनास्था असून प्रायोजकत्व देण्यासाठी विपणन कोटय़ाखाली ठेवण्यात आलेला राखीव निधीही कंपन्यांकडे शिल्लक नसल्याचे कारण दिले जात आहे.

दिवाळीनंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांमध्ये मुंबईसह, ठाणे जिल्ह्य़ातील विविध महाविद्यालयांमध्ये आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांची मोठी धामधूम  असते. विद्यार्थी दोन महिन्यांपूर्वीच या महोत्सवांच्या तयारीला लागतात. दोन ते पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवांमध्ये विविध चर्चासत्रे, व्याख्यानांसह निरनिराळ्या स्पर्धा आणि खेळांचे आयोजन करण्यात येते. ३ ते ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा आणि २०० हून अधिक महाविद्यालयांचा या महोत्सवांमध्ये सहभाग असतो. मोठय़ा उत्साहात साजरे होणारे हे महोत्सव यंदा जल्लोषात साजरे होणार की नाही याची चिंता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटू लागली आहे. वाहन उद्योगासह त्यावर आधारित इतर पूरक उद्योगांमध्ये आणि एकंदरीतच इतर क्षेत्रांमध्ये आलेल्या मंदीच्या झळीचा फटका हा महाविद्यालयीन महोत्सवांना बसत आहे. महोत्सवासाठी १ लाखापासून ते पाच लाखांपर्यंतचे आर्थिक नियोजन महोत्सव आयोजकांकडून करण्यात येते. विद्यार्थीच महोत्सवासाठी लागणारे पैसे प्रायोजकत्वाच्या माध्यमातून संकलित करतात आणि यावर महोत्सव होत असतो. महाविद्यालय व्यवस्थापनाकडून यासाठी आर्थिक मदत दिली जात नाही. विपणन, जनसंज्ञापन यासारख्या विविध अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे आणि विपणनाची कला अवगत असणारे विद्यार्थी महोत्सवाच्या प्रायोजकत्व समूहात असतात. या विद्यार्थ्यांवर महोत्सवासाठी प्रायोजकत्व आणण्याची जबाबदारी असते. मात्र येत्या महिनाभरावर आलेल्या महोत्सवासाठी अद्याप पुरेसे प्रायोजकत्वच मिळत नसल्याचे महोत्सव आयोजनातील विद्यार्थी प्रतिनिधींकडून  सांगण्यात आले आहे.  महोत्सवामध्ये पैसे गुंतवल्यावर काहीच फायदा होत नाही, तसेच सध्या असेले आर्थिक मंदीचे मळभ लक्षात घेता विपणनासाठी अतिरीक्त पैसे आणायचे तरी कुठून अशी उत्तरे बाजारपेठेतील दुकानदार आणि उद्योजकांकडून मिळत असल्याचे एमसीसी महाविद्यालयातील सांस्कृतिक मंडळाची विद्यार्थी प्रतिनिधी आणि स्पेक्ट्रम महोत्सवाची सदस्य रिया बोरकर हिने सांगितले. उद्योजक आणि दुकानदारांकडे पैसे असूनही ते केवळ बाजारातील एकंदर अस्थिरतेच्या भीतीने प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पैसे गुंतवत नसल्याचे वझे केळकर महाविद्यालयातील ‘डायमेन्शन’ या महोत्सवाचा प्रतिनिधी अथर्व कुलकर्णी याने सांगितले. महाविद्यालयीन महोत्सवासाठी प्रायोजकत्व आणणे हे जिकिरीचे झाले आहे. केवळ राजकीय नेतेच त्यांच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून प्रायोजकत्व देतात. त्यामुळे महोत्सवासाठी निधी उभा करणे कठीण होऊन जाते, असे जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या गंधर्व महोत्सवाचा सदस्य असणाऱ्या अमितेश ताम्हाणे याने सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी जोशी बेडेकर महाविद्यालयात झालेल्या क्रिसलीस या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवासाठी प्रायोजकत्वाच्या माध्यमातून पैसे उभे करणे मोठे कठीण गेल्याचे महोत्सवाचा प्रतिनिधी अग्नेश जाधव याने सांगितले. एखाद्या दुकानदार किंवा व्यावसायिकाकडे प्रायोजकत्वाकरिता गेल्यावर विपणनासाठी ठेवण्यात आलेले अतीरीक्त पैसेच यंदा नसल्याचे उत्तर उद्योगाच्या विपणन अधिकाऱ्यांनी दिल्याचे अग्नेशने सांगितले.

सध्याच्या काळात जाहीरात करणे, विपणन करणे महत्त्वाची बाब आहेच. मात्र सध्या कोणीही उद्योजक किंवा दुकानदार महोत्सवांना प्रायोजकत्व देण्यास तयार नाही. आंतरमहाविद्यालायातील महोत्सवाच्या माध्यमातून तसा परतावा, फायदाही प्रायोजकत्व देणाऱ्या व्यक्तीला होत नाही. – रसिक छेडा, राम मारुती रोड फाऊंडेशन (व्यापारी)