सहा तासांसाठी दुचाकीला तीन रुपये, तर चारचाकीसाठी सहा रुपये आकारणार

घोडबंदर येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात येणाऱ्या प्रेक्षकांना नाटय़गृहाच्या वाहनतळात वाहन पार्किंगसाठी आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

नुकत्याच काढलेल्या निविदेद्वारे ही माहिती समोर आली आहे. पूर्वी चार तासांसाठी दुचाकीला पाच रुपये तर चारचाकीला पंधरा रुपये पार्किंगसाठी मोजावे लागत होते. मात्र आता सहा तासांसाठी दुचाकीला तीन रुपये आणि चारचाकी वाहनासाठी सहा रुपये शुल्क वाहनचालकांकडून आकारण्यात येणार असल्याचे स्थावर मालमत्ता विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

घोडबंदर येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटयगृहात रसिकांचा ओढा हा जास्त आहे. या नाटय़गृहाच्या बांधणीच्या वेळेस तीन वर्षांपूर्वी नाटय़गृहात येणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रशस्त वाहन तळही उभारण्यात आले. ५८१० चौरस मीटर आकाराचे हे वाहनतळ असून या वाहनतळात एकाच वेळी एक हजार दुचाकी आणि शंभर चारचाकी वाहने उभी राहण्याची क्षमता आहे. नाटय़गृहात येणाऱ्या प्रेक्षकांकडून त्यांची वाहने वाहनतळात पार्क करण्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येते. मात्र सध्याचे वाहनतळ चालवणाऱ्या ठेकेदाराचा करार कालावधी संपुष्टात आला असून पुन्हा नव्याने वाहनतळ भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. या निविदेत नाटय़गृहातील वाहनतळात वाहने पार्क करण्याच्या शुल्क दरात पहिल्यापेक्षा निम्म्याने घट करण्यात आली असून आता प्रेक्षकांना कमी शुल्कात त्यांची वाहने वाहनतळात पार्क करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागातर्फे देण्यात आली आहे. सुरुवातीला वाहनतळात येणाऱ्या वाहन चालकांकडून पहिल्या दोन तासांकरिता दहा रुपये, दोन ते चार तास या कालावधीत अतिरिक्त पाच रुपये आणि चार तासांपुढील प्रत्येक तासाला पाच रुपये शुल्क आकारण्यात येत होते. त्यानंतर चार तासासाठी दुचाकीला पाच रुपये तर चारचाकी वाहनाला १५ रुपये शुल्क पार्किंगकरिता मोजावे लागत होते. मात्र आता सहा तासांसाठी दुचाकीला तीन रुपये व चारचाकी वाहनासाठी सहा रुपये इतके शुल्क आकारण्यात येतील. पुढील सहा तासांसाठी म्हणजे एकूण १२ तासासाठी दुचाकीला सहा रुपये व चारचाकीला १८ रुपये आकारण्यात येतील.

अपंगासाठी दहा जागा राखीव?

सध्याच्या वाहनतळ भाडेतत्त्वाची निविदा संपुष्टात आली असून तीन वर्षांच्या कराराकरिता वाहनतळ नव्याने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी महापालिकेतर्फे निविदा काढण्यात आली आहे. या भाडेतत्त्वातून पालिकेला वर्षांकाठी २ लाख ४४ हजार ६७५ इतके उत्पन्न अपेक्षित आहे. या वाहनतळामध्ये अंध, अपंग व मूकबधिर व्यक्तींच्या वाहनांसाठी दहा जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. याविषयी महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.