डागडुजीच्या कामामुळे नाटय़प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम बंद; ऐन उन्हाळय़ात नाटय़रसिकांचा विरस
ठाणे शहराचा नवा सांस्कृतिक चेहरा म्हणून ओळख निर्माण झालेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहातील पुढील एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी रात्री नाटय़गृहातील मुख्य सभागृहातील छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे, मात्र प्रत्यक्षात कामासाठी एक महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या कामांसाठी किमान महिनाभर हे नाटय़गृह बंद ठेवावे लागणार असून त्याचा फटका नाटकांना तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजकांना बसणार आहे.
ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात महापालिकेचे गडकरी रंगायतन हे नाटय़गृह आहे, मात्र घोडबंदरपासून हे नाटय़गृह लांब अंतरावर असल्यामुळे घोडबंदरवासियांना सांस्कृतिक कार्यक्रम तसेच नाटकांचा अस्वाद घेणे शक्य होत नव्हते. या पाश्र्वभूमीवर घोडबंदरवासीयांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी या परिसरात चार वर्षांपूर्वी महापालिकेने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह उभारले. या नाटय़गृहाच्या मुख्य सभागृहातील छताचे प्लास्टर सोमवारी रात्री कोसळल्याचा प्रकार घडला असून रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडल्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
चार वर्षांपूर्वीच उभारण्यात आलेल्या नाटय़गृहाच्या छताचे प्लॉस्टर कोसळल्यामुळे त्याच्या बांधकाम दर्जाविषयी आता अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. या घटनेनिमित्ताने डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाची अवघ्या चार वर्षांतच दुर्दशा झाल्याचे समोर आले आहे.

पडझडीचा इतिहास
अखिल भारतीय नाटय़संमेलना वेळी काही नाटकप्रेमींनी काशिनाथमधील ‘का’ हे अक्षर पडल्याची बाबही समोर आणली होती. त्यानंतर महापालिकेने त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. असे असतानाच सोमवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे नाटय़गृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या छताच्या दुरुस्तीचे काम काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी किमान पंधरा दिवसांसाठी नाटय़गृह बंद ठेवण्यात येणार आहे. असे असले तरी लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी, ठाणे महापालिका.