ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील मोठी नाटय़गृहे दुरुस्तीच्या कामांमुळे बंद करण्यात येत असतानाच घोडबंदर येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाचे लघू प्रेक्षागृह (मिनी थिएटर) देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी तीन महिन्यांपासून बंद असलेले हे प्रेक्षागृह जानेवारीपासून खुले करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु, दुरुस्तीच्या कामास अद्याप सुरुवातही झाली नसल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. जानेवारी महिन्यात हे प्रेक्षागृह खुले होण्याची शक्यता धूसर आहे.

ठाणे शहराचा मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाटय़गृहाच्या छताचे प्लॅस्टर कोसळल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली. या घटनेनंतर नाटय़गृहाच्या बांधकामाची तपासणी तज्ज्ञांमार्फत करण्यात आली आणि त्यांच्या अहवालानंतर नाटय़गृह दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आले. त्यामुळे विविध नाटय़ संस्था आणि कार्यक्रमांच्या आयोजकांनी आता घोडबंदरमधील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. घाणेकर नाटय़गृहावर नाटकांच्या प्रयोगाचा आणि विविध कार्यक्रमांचा भार वाढू लागल्याचे चित्र आहे. या नाटय़गृहामधील ‘मिनी थिएटर’ गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे नाटकांचे प्रयोग आणि कार्यक्रमांचे नियोजन करताना व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑक्टोबरपासून बंद असलेल्या या प्रेक्षागृहाची दुरुस्ती डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत खुले करण्याचा प्रयत्न होता. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील कार्यक्रमांची पूर्वनोंदणी करण्यासाठी ३५ हून अधिक अर्ज व्यवस्थापनाकडे आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात या प्रेक्षागृहाच्या दुरुस्तीलाच सुरुवात झाली नसल्याने हे कार्यक्रम कसे होणार, असा प्रश्न पडला आहे.

प्रेक्षागृह खुले करायचे की नाही, याचा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागविण्यात आला असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले, कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता दत्तात्रय मोहिते यांनी दिली.

शाळा, संस्थांवर आता खर्चाचा भार

डिसेंबर ते जानेवारी या काळात शाळा महोत्सवांचे आयोजन करते. शाळा आणि इतर संस्थांना मिनी थिएटर येथे कार्यक्रम सादर करणे सोईस्कर असते. मिनी थिएटरचे भाडे मोठय़ा सभागृहापेक्षा तुलनेने कमी असते. त्यामुळे आर्थिक दृष्टय़ा शाळा आणि संस्थांना मिनी थिएटर परवडणारे असते. मात्र मिनी थिएटर बंद असल्यामुळे शाळा किंवा इतर संस्थांना आता मोठय़ा सभागृहाचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे नाटय़संस्थांना सभागृह उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.