News Flash

नालेसफाई, रस्ते दुरुस्ती वेळेत पूर्ण करा

ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा facebook; photo credit

ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाणे : येत्या  पावसाळ्यात कोणतीही आपत्ती निर्माण झाली तर सर्वानी एकत्रितपणे आणि सतर्कतेने काम करावे तसेच शहरातील नालेसफाई आणि रस्त्याच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गुरुवारी सर्व विभागांना बैठकीत दिले. तसेच महापालिका अधिकाऱ्यांनी २४ तास मोबाइल चालू ठेवावेत आणि कामाच्या वेळेत मोबाइल बंद असल्याचे आढळून आले, तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

ठाणे महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये गुरुवारी मान्सूनपूर्व आणि मान्सून कालावधीतील कामांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सद्य:स्थितीत रस्त्यांच्या दुरुस्तीची जी कामे सुरू आहेत, ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच घनकचरा विभागाच्या वतीने प्रत्येक प्रभाग समितीनिहाय साफसफाई करण्याच्या सूचना आयुक्त शर्मा यांनी बैठकीत दिले. संपूर्ण नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. प्रभाग समितीनिहाय अनधिकृत कामांची पाहणी करणे, धोकादायक इमारतींची यादी तयार करून राहणाऱ्या नागरिकांना इतरत्र स्थलांतरित करून सी १ व सी २ इमारती रिकाम्या करण्याचे आदेशही त्यांनी साहाय्यक आयुक्तांना दिले.

ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत, तिथे तात्काळ चेंबरची झाकणे बसविणे, चर बुजविणे आणि खड्डे बुजविण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. आपत्ती उद्भवल्यास कमीत कमी वेळात मदत पथक घटनास्थळी पोहोचावे, यासाठी मनुष्यबळ आणि यंत्रणा विकेंद्रित करून ती विविध ठिकाणी नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी औषधफवारणी करावी. आवश्यक तो औषधसाठा उपलब्ध करून प्रतिबंधात्मक सुविधा निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 6:30 am

Web Title: drain cleaning road repairs complete on time thane municipal commissioner zws 70
Next Stories
1 विक्री मंदावल्याने फुलांचा कचरा
2 ग्लोबल रुग्णालयात पैसे घेतल्याचा आरोप
3 ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे-शिरडकर यांचे निधन
Just Now!
X