जलवाहिनी काढली, मात्र दूषित पाण्याचा पिंपात भरून वापर

प्रसेजीत इंगळे, लोकसत्ता

वसई : वसई-विरारमध्ये नाल्याच्या पाण्यावर शेती केली जात असून पालिका प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नसून उलट कारवाई होऊ नये म्हणून शेती करणाऱ्यांनी जुन्या साडय़ा, कापड यांचे कुंपण घालून ही शेती झाकण्याचा प्रयत्न केला आहे. नाल्यातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या काढून टाकल्या असून नाल्याचे पाणी पिंपात भरून वापरले जात आहे.

वसई-विरार शहरात नाल्याच्या पाण्यावर शेती केली जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशात आणले होते. याबाबत स्थानिक प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अजूनही कारवाई झाली नसून अजूनही नाल्याच्या पाण्यावर शेती केली जात आहे. महापालिका आणि अन्न आणि औषध प्रशासन विभाग अनभिज्ञ आहे.

विरार पूर्वेला फुलपाडा परिसरात जवळपास चार एकर शेतात अशा प्रकारे भाजीपाला पिकवून बाजारात विक्री केला जात आहे. आता ही शेती करणाऱ्यांनी आपल्या शेताला साडी आणि कपडय़ाचे कुंपण लावले आहे. यामुळे शेतात काय चालले याचा पत्ता लागत नाही. तसेच त्यांनी गटारातून पाण्यासाठी टाकलेली जलवाहिनी आणि पंप काढून टाकले आहेत. त्याऐवजी आता रात्रीच्या वेळी गटाराचे पाणी पिंपात भरून त्याचा वापर केला जात आहे.

याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या अनुषंगाने आम्ही पाहणी करत आहोत. ज्या ठिकाणी खरोखर गटाराच्या पाण्यावर शेती केली जात असल्यास, तपासणी करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनी अशी शेती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.

– प्रकाश वाघमारे, साहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

गटाराच्या पाण्यावर केली जाणारी शेती ही नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक आहे. अशा पद्धतीची भाजी ही रसायनयुक्त असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ  शकतो.प्रशासनाने यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

– जितेश पाटील, शेतकरी, विरार मिनरल वॉटर म्हणून अशुद्ध पाणी