कल्याण, डोंबिवलीतील नालेसफाई रखडली; कामे सफाई कामगारांकडूनच करून घेणार 

पावसाळा तोंडावर आला तरी कल्याण-डोंबिवली पालिकेची नालेसफाई ‘निविदे’च्या घोळात अडकली आहे. निविदा प्रक्रिया रखडल्याने नालेसफाईची कामे सुरू नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कामे सुरू होतील आणि नाल्यांतून काढलेला गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. एकीकडे नालेसफाईचा घोळ सुरू असताना, या वेळी आयुक्तांनी ताठर भूमिका घेत प्रभागांमधील गटारसफाईची कामे मजूर कामगार संस्थांना (नगरसेवकांच्या कामगार संस्था) देण्यास कडाडून विरोध केला आहे. पालिका तिजोरीची उधळपट्टी रोखण्यासाठी ही कामे पालिका सफाई कामगारांनी करावीत, असे फर्मान आयुक्तांनी सोडले आहे. त्यामुळे नाले, गटारसफाईवरून पालिकेत सध्या चिंतेचे वातावरण आहे.

दर वर्षी एप्रिलअखेपर्यंत नाले, गटारसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात. या वेळी जलअभियंता चंद्रकांत कोलते यांनी नालेसफाईच्या कामासाठी निविदा मागविल्या. मे. राजेश कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने ऑनलाइन निविदा दाखल केली. या ठेकेदाराने त्यांच्या कागदपत्रांमध्ये पॅनकार्डवर स्वाक्षरी नसल्याचे  कारण देत कोलते यांनी राजेश यांची निविदा फेटाळली.

पावसाळा तोंडावर आला तरी प्रशासनाने घातलेल्या नालेसफाई कामांच्या गोंधळाबद्दल स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी नाराजी व्यक्त केली. जो ठेकेदार लाखोंची कामे करतो. त्याला पॅनकार्ड पुन्हा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देणे आवश्यक होते. तशी मुदत न देताच जल अभियंता कोलते यांनी स्वत:च्या अधिकारात नवीन निविदा मागविली.

या निविदेचे प्रस्ताव तयार होऊन तो पुन्हा स्थायी समिती समोर मंजुरीला जाईल. त्यानंतर नालेसफाईची कामे सुरू होतील, असे समिती सदस्यांनी सांगितले. केवळ मर्जीतल्या ठेकेदाराची वर्णी लागण्यासाठी अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे नालेसफाईशी खेळ केला असल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे.

गटारांची सफाई रखडली

गटार तुंबण्याचे सर्वाधिक प्रकार बाजारपेठा, घाऊक बाजारांच्या ठिकाणी होतात. येथील विक्रेते सगळा कचरा, प्लास्टिक, गोणी गटारांच्या टाकतात. तेथील गटारांची सफाई प्राधान्याने होणे आवश्यक आहे. या वेळी मजूर कामगार संस्थांना गटारसफाईची कामे न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बहुतांशी कामगार संस्था या नगरसेवकांच्या असल्याची चर्चा आहे. काही संस्थांमध्ये नगरसेवक भागीदार असल्याचे समजते.

लाखो रुपयांची बचत

पालिकेत २२७४ सफाई कामगार कार्यरत आहेत. पालिकेत एवढे मनुष्यबळ उपलब्ध असताना अनाठायी खर्च कशासाठी करायचा असा प्रश्न प्रथमच आयुक्त गोविंद बोडके यांनी करून पालिकेची दर वर्षी गटार सफाईच्या नावाने होणारी उधळपट्टी रोखली आहे. गटार सफाईची पाच लाख रुपयांची कामे अधिकारी आपल्या हेतू साध्य करण्यासाठी मजूर कामगार संस्थांना २५ ते ३० लाख रुपयांना देतात. प्रत्यक्षात हे काम चार ते पाच लाखाचे पण नसते, असे सोदाहरण माजी नगरसेवक शरद गंभीरराव यांनी सभागृहात स्पष्ट केले होते.

नालेसफाईची कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजेत. प्रशासनाने निविदा प्रक्रियेच्या नावाखाली जो घोळ घातला आहे. तो त्यांनी निस्तरावा. पण, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने नाले, गटार सफाईची कामे झाली पाहिजेत, असे आपण प्रशासनाला बजावले आहे.   – राहुल दामले, सभापती, स्थायी समिती

कल्याण, डोंबिवलीतील ९४ मोठे नाले सफाई कामाचे कंत्राट देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एका ठेकेदाराने निविदा सादर करताना काही तांत्रिक चुका केल्या. त्यामुळे फेर निविदा मागतली आहे. नालेसफाईची कामे खोळंबू नयेत. म्हणून त्या ठेकेदारांकडून कामे सुरू केली आहेत. तशी कामे सुरू करता येतात.  नालेसफाईसाठी सव्वा तीन कोटींची तरतूद आहे.  -चंद्रकांत कोलते , जल अभियंता ,कडोंमपा