आशीष धनगर

भिवंडीतील कामवारी नदीत गटारांचे सांडपाणी, कचरा, रासायनिक मैला

ठाणे जिल्ह्यतील वालधुनी आणि उल्हास या नद्यांमधील प्रदूषण आणि अस्वच्छतेचा मुद्दा गंभीर रूप धारण करत असतानाच ठाणे जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक नदीचा जीव प्रदूषणाच्या विळख्यामुळे गुदमरू लागला आहे. भिवंडी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या कामवारी नदीत शहरातील मुख्य नाल्यांतून सर्रास सांडपाणी सोडले जात असून या परिसरातील कंपन्यांचे रासायनिक सांडपाणीही नदीच्या पाण्यात मिसळले जात आहे. नदीच्या पात्रात ठिकठिकाणी आढळणारे कचऱ्याचे ढीग, पृष्ठभागावर साचलेली जलपर्णी या साऱ्यांमुळे ही नदी अखेरची घटका मोजत आहे.

यंत्रमाग आणि लघुउद्योगांचे केंद्र म्हणून भिवंडी शहराला पूर्वीपासून ओळखले जाते. या शहरातून वाहणाऱ्या कामवारी नदीला या उद्योगांचा सुरुवातीपासूनच फटका बसला आहे. सोळाव्या शतकात कामवारी नदीतून जलवाहतूक होत होती, असे दाखले इतिहासतज्ज्ञ देतात. नदीच्या पात्रात अनेक नैसर्गिक जलस्रोत असल्याचीही नोंद आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या नदीची प्रदूषणामुळे दुर्दशा झाली आहे.

नदीच्या काठावर शहरातील अनेक तबेले, कत्तलखाने आणि लघुउद्योग उभे राहिले आहेत. या सर्वाचे सांडपाणी सर्रासपणे नदीच्या पात्रात सोडण्यात येत असल्याचे दिसून येते. ठाणे जिल्हा प्रशासनाचे याकडे वर्षांनुवर्षे दुर्लक्ष होत असून नदी पात्रालगत उभे राहणारे बेकायदा बांधकामांकडेही प्रशासन डोळेझाक करत असल्याच्या तक्रारी आहेत.

भिवंडी शहराच्या प्रवेशद्वारावरील नदीनाका या भागात कामवारी नदीचे मोठे पात्र आहे. या नदीपात्रात नागरिकांकडून तसेच आजूबाजूच्या दुकानदारांकडून कचरा फेकला जातो. त्या ठिकाणी भिवंडी महापालिकेने फलक उभारून त्यावर कचरा टाकू नये अशी सूचना केली आहे. मात्र त्याकडे नागरिक आणि दुकानदार दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार सुरू असतात. नदीत साठलेल्या कचऱ्याने परिसरात दरुगधी पसरली आहे. नदीच्या काठावर अनेक ठिकाणी सार्वजानिक शौचालये असून त्याचे सांडपाणीही नदीत सोडण्यात येते.  नदीच्या उर्वरीत भागांत इचॉर्निया नावाच्या जलपर्णी मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. त्याकडेही भिवंडी महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.

बांधामुळे गाळ साचून

कामवारीचे पाणी अडवण्यासाठी नदीवर ठिकठिकाणी बांध घालण्यात आले आहेत. तसेच नदीच्या पात्रात मोठय़ा प्रमाणात कचरा टाकल्याने गाळ तयार झाला आहे. या गाळामुळे नदीच्या पात्राचा आकार कमी झाला आहे. पावसाळ्यात नदीचे पात्र पूर्ण भरते. मात्र बांधामुळे पाण्यातील कचरा वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन परिसरात पाणी तुंबत असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले.

कामवारी नदीचे सातत्याने प्रदूषण होत आहे. यामुळे नदीपात्र आणि पाण्यातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. या नदीच्या प्रदूषणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. नदी स्वच्छ झाल्यास या पाण्याचा वापर शहरातील नागरिकांना करता येऊ शकतो.

– विकी पाटील, पर्यावरण अभ्यासक आणि साहाय्यक प्राध्यापक, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय