08 July 2020

News Flash

सांडपाणी थेट नदीत

बदलापूर शहरातून सर्वाधिक सांडपाणी उल्हास नदीत मिसळत आहे.

उल्हास, वालधुनी नद्यांचे जलप्रदूषण सुरूच; सांडपाणी प्रक्रिया केंद्रे चालवण्यात पालिकांना अपयश

बदलापूर : उल्हास आणि वालधुनी नद्यांच्या प्रदूषणाबाबत अंबरनाथ, कुळगाव बदलापूर नगरपालिका आणि उल्हासनगर महापालिका राबवत असलेल्या उपायांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालातून आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सांडपाणी वाहिन्यांची योग्य व्यवस्था नसणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची कमतरता अशा विविध कारणांमुळे बदलापुरातील घरगुती सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सात दिवसांत सविस्तर अहवाल देण्याचे आदेश या संस्थांना दिले आहेत.

उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदुषणावरून वनशक्ती संस्थेतर्फे उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेविरोधात राष्ट्रीय हरित लवादात तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत लवादाने संबंधित पालिकांना १०० कोटी रुपयांचा दंड ठोठाविला. त्यानंतर राज्याच्या सचिवांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देत प्रदूषण रोखण्याची जबाबदारी घेतली होती. तसेच राज्य सरकारने या स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांच्या माध्यमातून प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभारण्यासाठी निधी देऊ  केला होता. असे असताना विविध कारणांमुळे या योजना रखडल्याने उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदूषण अजूनही सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबत दिलेले निर्देश आणि पालिका तसेच सचिवांनी दिलेले सत्य प्रतिज्ञापत्रावर अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने पालिकांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पालिकांच्या या कामावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल नुकताच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला मिळाला. त्यात कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका तसेच उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील घरगुती सांडपाणी अजूनही उल्हास आणि वालधुनी नदीत मिसळत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोटय़वधी रुपये खर्च करूनदेखील तीनही शहरात उभारण्यात आलेल्या भुयारी गटार योजनांचे काय झाले, असा सवाल उपस्थित होतो आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आता कुळगाव बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर पालिकेला नोटीस बजावली आहे. सात दिवसांत कार्यवाही अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

अहवालातील ठळक मुद्दे

’ बदलापूर शहरातून सर्वाधिक सांडपाणी उल्हास नदीत मिसळत आहे.

’ याच भागात असलेल्या पनवेलकर संकुलातून दहा लाख लीट तर हेंद्रेपाडा येथील नाल्यातून १० ते १२ दशलक्ष लिटर घरगुती सांडपाणी थेट उल्हास नदीत मिसळते.

’ उल्हास नदीतील पिण्यायोग्य पाण्याच्या क्षेत्रात हे पाणी मिसळत असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

’ बदलापूरात २२ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असला तरी त्याची देखभाल दुरुस्ती योग्यरीत्या होत नसल्याने त्यातून फेसाळ पाणी नदीत सोडले जाते आहेत. तसेच येथे कोणतीही मोजणीची यंत्रणा तसेच ऑनलाइन तपासणी यंत्रणा बसवण्यात आलेली नाही.

’ अंबरनाथ शहरातील सहा दशलक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय वालधुनी नदीत मिसळत आहे.

’ उल्हासनगर शहरात घरगुती सांडपाणी एकत्रित करण्यात आणि त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारण्यात पालिकेला अपयश आले आहे. तसेच शहरातील सांडपाणी वाहून नेण्याचे जाळे उभारण्यात अपयश आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2019 4:07 am

Web Title: drainage water directly released into ulhas waldhuni river
Next Stories
1 ठाणे जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांच्या संख्येत वाढ
2 ३७८ इमारती धोकादायक
3 ठाण्याचा कचरा खारफुटीवर
Just Now!
X