ठाणे महापालिकेच्या चितळसर-मानपाडा भागातील स्मशानभूमीत लहान मुलांच्या दफनविधीसाठी असलेल्या जागेवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दफनविधीसाठी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीला खेटूनच चाळी असून या घरांमधील सांडपाणी वाहून नेणारे पाइप दफनविधीच्या जागेवर सोडण्यात आले आहेत. या स्थितीकडे ना चाळवासीयांना काळजी आहे ना महापालिका प्रशासन गंभीर.
घोडबंदर भागासाठी चितळसर-मानपाडा परिसरात लहान मुलांच्या दफनविधीतही अनंत अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. या स्मशानभूमीत लहान मुलांच्या दफनविधीसाठी मोकळी जागा आहे. मध्यंतरी, महापालिकेने स्मशानभूमीमधील झाडांच्या फांद्या छाटून त्या लहान मुलांच्या दफनविधीच्या जागेवर टाकून दिल्या. झाडांचा पालापाचोळा अजूनही दफनविधीच्या जागेवर पडलेला आहे. स्मशानभूमीत महापालिकेचा कर्मचारीही नाही. त्यामुळे पालापाचोळ्याच्या कचऱ्यातून जागा शोधत नागरिकांनाच दफनविधी पार पाडावा लागतो. तसेच दफनविधीच्या जागेला खेटून स्मशानाची संरक्षक भिंत असून या भिंतीच्या पल्याड चाळी आहेत. चाळीतील रहिवाशांनी स्मशानाच्या संरक्षक भिंतीला खेटून घरे उभारली असून घरातील सांडपाणी वाहून नेणारे पाइप स्मशानभूमीच्या आतमध्ये सोडले आहेत. त्यामुळे पाइपद्वारे येणारे सांडपाणी दफनविधीच्या जागेवर येते. विधीपूर्वक लहान मुलांचा अंत्यविधी करण्यात येतो खरा, पण या प्रकारामुळे चिमुरडय़ांच्या नशिबी मात्र नरकयातनाच येतात, असे म्हणावे लागेल. या प्रकारामुळे त्या चाळीतील रहिवाशांच्या संवेदना संपल्याचे समोर येते. यासंबंधी वारंवार तक्रारी येऊनही महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
नीलेश पानमंद, ठाणे
सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये दारूपार्टी
स्मशानभूमीच्या आवारात एक बेवारस रिक्षा उभी असून या रिक्षाच्या आडोशाला मद्यपींनी आपला अड्डा बनविला आहे. या रिक्षाच्या आसपास दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आहेत. रिक्षाच्या बाजूलाच महापालिका कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांसाठी एक केबिन आहे. या केबिनचा दरवाजा उघडा असल्याने तिथेही दारुडय़ांची बैठक रंगते, अशी माहिती रहिवाशांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 1:06 am