17 October 2019

News Flash

वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने नाटकाचा खोळंबा

कल्याणमधील अत्रे रंगमंदिरात प्रेक्षकांचा गोंधळ

कल्याणमधील अत्रे रंगमंदिरात प्रेक्षकांचा गोंधळ
वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने मध्यंतरानंतर नाटकाचा खेळ तासाभरासाठी बंद पाडण्याचा प्रकार गुरुवारी येथील आचार्य अत्रे नाटय़गृहात घडला. अखेरीस नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाने वातानुकूलन यंत्रणा पूर्ववत केल्यानंतर नाटकाचा उर्वरित प्रयोग पार पडला.
येथील आचार्य अत्रे नाटय़गृहात गुरुवारी दुपारी ‘ती फुलराणी’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. मात्र, प्रयोगाला सुरुवात झाल्यानंतर नाटय़गृहात कमालीचा उकाडा जाणवायला लागला. या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या प्रेक्षकांनी नाटकाचे निर्माते धनंजय चाळके यांना संपर्क करून नाटय़गृहातील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याची तक्रार केली. चाळके यांनीही तातडीने नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. नाटकाच्या मध्यंतरापर्यंत हा प्रकार सुरू होता. मध्यंतरानंतर मात्र प्रेक्षकांनी नाटय़गृहात जाण्यास विरोध केला. वातानुकूलन यंत्रणा सुरू होत नाही तोपर्यंत नाटकाचा उर्वरित प्रयोग सुरूच न करण्याचा निर्धार प्रेक्षकांनी केला.

अत्रे रंगमंदिरात नाटकाच्या वेळी वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली होती. प्रेक्षक संख्या अधिक असल्याने त्याचा ताण आला. त्यामुळे काही वेळ प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. पण तातडीने वातानुकुलीत यंत्रणा सुरु करण्यात आली.
– गणेश बोराडे, व्यवस्थापक, अत्रे रंगमंदिर , कल्याण

First Published on April 15, 2016 12:38 am

Web Title: drama play daly due to ac not working
टॅग Marathi Drama