दिल्ली निर्भया बलात्कार प्रकरणामुळे महिला अत्याचाराबद्दलची तीव्र भावना देशभर उमटली. देशाच्या कानाकोपऱ्यांत या समस्येला तोंड देणाऱ्या असंख्य निर्भया आहे. मात्र या निर्भयांनी खचून न जाता बलात्कारी प्रवृत्तीविरोधात समाजमन एकवटण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वंचिताच्या रंगमंचाच्या माध्यमातून ठाण्यातील कलाकारांनी गुरुवारी हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील गरीब वस्त्यांमधील सुमारे ३५ हून अधिक मुलांनी या उपक्रमात सहभागी होत नाटय़कला सादर केली. या वेळी बालकलाकारांनी दोन नृत्ये सादर केली. युवा कलाकारांनी चार लघुनाटिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पार पडलेल्या ‘वंचितांचा रंगमंच’ या उपक्रमांतर्गत ‘नाटय़ जल्लोष’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाण्याचे महापौर संजय मोरे, ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ उपस्थित होते. ठाण्यातील गरीब वस्त्यांमधून, प्रामुख्याने ठाणे महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या युवा वर्गासाठी नाटय़ जल्लोषच्या माध्यमातून मतकरी यांनी वंचितांना रंगमंच उपलब्ध करून दिला आहे, याबद्दल महापौरांनी मतकरी दाम्पत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वंचित समूहात असलेली अंगभूत प्रतिभा आणि त्यांच्या भावभावना व्यक्त करताना त्यांच्याकडून अजूनही अचूक व पूर्णपणे निर्दोष कलाकृती होत नसली तरी त्यांना व्यक्त होण्याची मिळणारी संधीच त्यांना पुढे जाण्यास प्रवृत्त करेल, असे मत मतकरी यांनी व्यक्त केले. तर पुढील काळात या कलाकारांसाठी संस्था विशेष नाटय़ कार्यशाळा आयोजित करून त्यांचे दीर्घ नाटक बसविण्याचा प्रयत्न करेल व यातूनच ‘वंचितांचा रंगमंच’ प्रस्थापित नाटय़व्यवसायास चांगले कलाकार देईल, असा विश्वास संजय मंगला गोपाळ यांनी व्यक्त केला.

* किसननगरच्या युवकांनी निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित नाटिकेतून खूप क्रांतिकारी संदेश देण्याचा प्रयत्न केला.
* सावरकरनगरच्या मुलांनी ‘सुटका’ या लघुनाटिकेतून बिबटय़ा व अन्य पशुधन वाचविण्यासाठी समाजाने पुढे यायला हवे, हे अत्यंत परिणामकारक रीतीने सादर केले.
* घोडबंदर रोडच्या एकलव्य विद्यर्थ्यांनी ‘आपण शांत का?’ या लघुनाटिकेतून समाजातील गुंडागर्दी, भ्रष्ट राजकारणी यांच्या अरेरावीविरुद्ध समाज इतका शांत का, असा उद्वेगपूर्ण सवाल प्रभावीपणे उभा केला.
* ढोकाळीच्या मुलांनी गरीब घरातील दैना, पालकांचे मुलांवर होणारे अत्याचार व अशा वेळी आजूबाजूच्या समाजाची जबाबदारी या विषयवर प्रभावी सादरीकरण केले.
* या सर्व नाटिकांच्या लेखन, दिग्दर्शनाबरोबरच ध्वनी व प्रकाश योजनेचे कामही या मुलांनी केले होते.
* लेखक म्हणून संजय निवंगुने, कार्तिक हजारे, मनोज परिहार, विश्वनाथ चांदोरकर यांनी चमक दाखवली तर दिग्दर्शनाची धुरा गौरव हजारे, श्रुती अमोनकर व करण, संजय निवंगुने आणि विश्वनाथ यांनी सांभाळली. सिद्धांत शिंदे, गौरव हजारे, रोहित शर्मा, गौरव आहेर यांनी संगीताची तर अजेय संस्थेच्या क्षितिज कुलकर्णी, गौरव, अवधूत आदी कलाकारांनी या मुलांना मोलाची साथ दिली.