अशोक समेळ, नाटककार

वाचन माणसाला ज्ञान, प्रगल्भता आणि अनुभवांचे भांडार खुले करून देत असते. त्यामुळे वाचनाने मनुष्य बौद्धिकदृष्टय़ा श्रीमंत होत असतो. पुस्तकांनी मला माझ्यातील स्वत्व ओळखण्यास मदत केली. त्यामुळे माझ्या जीवनात पुस्तकांचे विशेष स्थान आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून मला वाचनाचा छंद जडला. आम्ही एकत्र कुटुंबात वाढलो. घरातील प्रत्येक जण कलेची आवड असणारा होता. लेखन आणि वाचन या संदर्भात अनेक गोष्टी कानावर पडत असत. लहानपणी आमचे काका घरातील सर्व लहान मुलांना महाभारतातील गोष्टी सांगायचे. त्यामुळे नकळत वाचनाची ओढ लागली.

बाबुराव अर्नाळकरांच्या साहित्यापासून मी वाचन सुरू केले. त्यांच्या कादंबरीतील झुंझार, काळा पहाड या नायकांनी मला रहस्यमय जगाची सफर घडवली. नाथमाधव यांचे ‘वीरधवल’, गो. ना. दातार यांचे ‘कालिकामूर्ती’, जी. ए. कुलकर्णी यांचे ‘रमलखुणा’, ‘काजळमाया’ अशी अनेक गूढ पुस्तके त्या काळात वाचली. जी. ए. कुलकर्णी यांच्या कादंबरीवर नाटक करावे अशी मनापासून इच्छा होती. पण त्यांच्या लेखनातील विलक्षण गूढता रंगमंचावर मांडणे सोपे नव्हते. या सर्व पुस्तकांचे वेड इतके होते की शाळेत मागच्या बाकावर बसून पाठय़पुस्तकात कादंबरी ठेवून वाचायचो. यावरून अनेकदा शाळेत मारही खाल्ला. पण पुस्तकांचे व्यसन लागले ते सुटलेच नाही. पुढे कॉलेजच्या विश्वात ‘छावा’, ‘पानिपत’, ‘मृत्युंजय’, बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’, रणजीत देसाई यांच्या ‘स्वामी’, ‘श्रीमानयोगी’ या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचल्या. या सर्व लेखकांच्या प्रभावी लेखनशैलीमुळे संपूर्ण इतिहास डोळ्यासमोर उभा राहत असे. सेन्ट्रल बँकेत नोकरी करत असताना मी चर्चगेट ते दादर बसच्या प्रवासात एक पूर्ण पुस्तक वाचून काढायचो. प्रवासात कुठे पुस्तके दिसली तर लगेच विकत घेत असे. कधी कधी पुस्तके विकत घेण्यासाठी खिशात पैसे नसत. मग त्यासाठी मुंबईभर पायपीट करून रद्दी विक्रेत्यांकडून दुर्मीळ पुस्तके मी शोधून आणत असे. तहान-भूक हरपून मी वाचत होतो. अनिल बर्वेची ‘डोंगर म्हातारा झाला’ ही कादंबरी मी वाचली आणि त्यावर पहिले नाटक केले. लेखक म्हणून माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या निमित्ताने सुधाताई करमरकर, काशिनाथ घाणेकर, दाजी पणशीकर यांच्यासोबत साहित्यिक गप्पा रंगायच्या. त्यांनी पुस्तक वाच म्हटले की, वाचायचे अशी माझी भूमिका असे. वि. वा. शिरवाडकर यांचे ‘वैष्णव’, रणजीत देसाई यांचे ‘समिधा’, डॉ. करंदीकर यांचे ‘विवेकानंद’, रघुनाथ माशेलकर यांचे ‘रिइन्व्हेंटिंग इंडिया’ अशी विविध पुस्तके वाचली. इंग्लिश लेखकांपैकी आयर्विन वॉलेस हा माझा आवडता लेखक. ‘सेव्हन मिनिट्स’, ‘मॅन’, ‘प्राइझ’ ही त्याची पुस्तके मी वाचून काढली. सिडने शेल्डन यांचे ‘अदर साइड ऑफ मिडनाइट’, ‘इफ टुमारो कम्स’ हीसुद्धा माझी आवडती पुस्तके. शेक्सपियर तर मी सर्व वाचून काढला.

व. पु. काळेंची ‘तिची वाट एकटीची’ ही कादंबरी मला फार आवडली आणि त्यावर वर नाटक केले. दुर्गाबाई भागवत यांच्या ‘व्यासपर्व’ या पुस्तकाने मला ‘अश्वत्थामा’ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. ‘अश्वत्थामा’ ही कादंबरी लिहण्यासाठी मी महाभारताचे १८ खंड, विष्णुपुराण, रुद्रपुराण, हरिवंशपुराण, शोकात्म विश्वपुराणदर्शन तसेच मॅग्गी लीद्ची ग्रेसी हिचे ‘द गोल्डन सॅक्रिफाइस ऑफ महाभारत’ इ. वाचन केले. मी वाचलेल्या सर्व लेखकांची वैविध्यपूर्ण भाषाशैली ‘अश्वत्थामा’मध्ये नकळत उतरली.

वाचलेली सर्वच पुस्तके मला आवडली. प्रत्येक पुस्तकामागे त्या त्या लेखकाची मेहनत असते. प्रत्येक पुस्तकात काही तरी वेगळे सापडतेच, फक्त तशी दृष्टी हवी. वाचनाच्या याच आवडीने मी आणि माझ्या पत्नीने चौदा हजारांची पुस्तके खरेदी करून आसपासच्या रहिवाशांसाठी वाचनालय सुरू केले. वाचनातून मी स्वत:चा शोध घेत राहिलो आणि तब्बल ५७ नाटके मी लिहिली. वाचनासाठी ठरावीक जागा किंवा वेळ हवी असे माझे नाही. अगदी रस्त्यातून चालतानाही पुस्तक वाचायची मला सवय होती. वाचनातून मी स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अजून पूर्णत्व आलेले नाही. महासागरातील एक थेंब मला सापडला आहे. अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. नवीन लेखकांचे लेखन आणि भाषा यांचा अनुभव घ्यायचा आहे. येणाऱ्या नवीन पिढीने तंत्रज्ञानाच्या वापरासोबत वाचन करायला हवे. मी माझी सर्व पुस्तके माझ्या येणाऱ्या पिढीसाठी जपून ठेवली आहेत. वाचन माणसाला आंतरिक शांतता देते. त्यामुळे मित्रांनो, वाचत राहा, हसत राहा.

शब्दांकन- मानसी जंगम