ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धेला रविवारी ठाण्यातील चिमुरडय़ांनी मोठा प्रतिसाद दिला. ठाण्यातील महापालिका तसेच खाजगी शाळांमधील २२ हजार विद्यार्थ्यांनी यावेळी ‘स्वप्नातील ठाणे’ चितारले. या स्पर्धेतून निवडण्यात आलेल्या ७५० चित्रांचे प्रदर्शन महापालिकेच्या कापुरबावडी येथील कलादालनामध्ये भरवण्यात येणार असल्याची घोषणा ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी यावेळी केली.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम क्रीडांगणामध्ये रविवारी सकाळी चित्रकला स्पर्धेला सुरुवात झाली. ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, कौस, शीळफाटा, दिवा या भागातील महापालिका आणि खाजगी शाळातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी ‘माझ्या स्वप्नातील ठाणे शहर’ या विषयावर आधारीत चित्र काढले. या विषयांतर्गत स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, निरोगी ठाणे, हरित ठाणे, सुदृढ ठाणे अशा उपविषयांचे चित्र विद्यार्थ्यांनी काढले. चित्रकला स्पर्धेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना प्रोत्सहान देण्यासाठी मान्यवरांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्या चित्रांचे कौतुक केले. स्पर्धा संपल्यानंतर निकाल जाहीर होईपर्यंत विविध मनोरंजक कार्यक्रम सादर करण्यात आले. जादूचे प्रयोग, मल्हार या नृत्यसंस्थेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी गणेशवंदना, एकविरा संस्थेने वारीचा अनुभव जिंवत साकारण्याचा प्रयत्न यावेळी केला. तर आंतराष्ट्रीय जिम्नॅशियम पुजा सुर्वे आणि तिच्या सहकारी खेळाडूंनी जिम्नॅस्टिकची प्रात्यक्षिके यावेळी सादर केली. चार गटामध्ये पारपडलेल्या या स्पर्धेसाठी सुमारे एक हजार पर्यवेक्षक, २०० परिक्षक उपस्थित होते. पहिल्या क्रमांकाला १० हजार रुपये, द्वितीय ८ हजार आणि तृतीय क्रमांक ६ हजार रुपयांचे आणि उत्तेजनार्थ ४ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.