महसूल गुप्तचर संचालनालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; वनविभागाला सूचना न देताच आरोपींची सुटका

किशोर कोकणे, ठाणे</strong>

नवी मुंबई येथील वाशी एपीएमसी मार्केट भागात सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका रक्तचंदनाने भरलेल्या ट्रकवर केंद्र सरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केलेली कारवाई वादात सापडली आहे. रक्तचंदनाची चोरटी वाहतूक होत असल्याचे समोर आले असतानाही महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकाऱ्यांनी संशयित आरोपींचे जबाब घेऊन त्यांना सोडून दिले. त्याहून धक्कादायक म्हणजे, या संदर्भात वनविभागाला सहा महिन्यांनंतर, २५ एप्रिल रोजी माहिती देण्यात आली. यावरून वनविभागाने नाराजी व्यक्त करत याबाबत ‘डीआरआय’कडे विलंबाचे कारण काय, अशी विचारणा केली आहे. तसेच संबंधित आरोपींचा शोधही सुरू केला आहे.

वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी कर्नाटकातून वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्ये आलेला एक ट्रक पकडला होता. या ट्रकमध्ये रक्तचंदनसदृश लाकूड गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना सापडले होते. यात रक्तचंदन असल्याची खात्री झाल्यानंतर हा ट्रक गुप्तचर संचालनालयाने ताब्यात घेतला. आंतरराष्ट्रीय बाजारात या लाकडाची किंमत १ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे समजते. गुप्तचर संचालनालयाने ट्रकमालकासह सात जणांचे जबाब नोंदवून  घेतले.

वाशी येथील बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या घाऊक बाजारांमधील काही बडे व्यापारी या प्रक्रियेत सहभागी आहेत का याचाही यानिमित्ताने तपास होण्याची आवश्यकता होती.

तसेच कारवाई केल्यानंतर नियमाप्रमाणे या प्रक्रियेची माहिती राज्याच्या वनविभागाला देणे अपेक्षित होते. तसे न करता गुप्तचर संचालनालयाने या सर्व संशयितांना जबाब घेऊन सोडून दिले.

त्यानंतर या संशयितांना एप्रिल महिन्यात नोटीस धाडून पुन्हा बोलावले गेले आणि यातील तिघांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर वनविभागाने या तिघांना अटक केली. मात्र, यातील चार आरोपी अद्यापही फरार आहेत. गुप्तचर संचालनालयाने कारवाई केल्यानंतर नियमानुसार आरोपींना वनविभागाच्या ताब्यात देणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने वनविभागाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची सूचना ‘डीआरआय’ला केली आहे.

यासंबधी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई कार्यालयाला ई-मेलद्वारे संपर्क साधून प्रश्न विचारले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. मात्र, त्यांनी भ्रमणध्वनीवर उत्तरे देण्यास टाळून प्रत्यक्ष भेटण्यास सांगितले.

याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाला कारवाईची माहिती देण्यास इतका विलंब का लावला याचा जबाब पत्रव्यवहार करून मागणार आहोत. तसेच इतर आरोपींचाही लवकरात लवकर शोध घेण्यात येईल.

– दिलीप देशमुख, वन क्षेत्रपाल, ठाणे वन विभाग.