कल्याण-डोंबिवलीत पालघर जिल्ह्यातून सुक्या मासळीची आयात; पेटय़ांचे दर पाचशे ते चार हजार रुपयांपर्यंत

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने अनेक जण सुक्या मासळीचे डबे भरून ठेवतात. मात्र यंदा करोना साथीने सर्वदूर थमान घातल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरांत ठरावीक भागांत मिळणारी सुकी मासळी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांनी वसई, विरार, नालासोपारा, नायगाव, पालघर, बोईसर भागांतून सुकी मासळीची आयात सुरू केली असून हे मासेही चढय़ा दराने विकले जात आहेत.

विरार, नालासोपारा, अर्नाळा, नायगाव भागांतील खारी मासळी चवदार असल्याने रहिवासी ती खरेदी करतात. करोना साथीचा संसर्ग होणार नाही अशा पद्धतीने घाऊक व्यापारी घरातून हे विक्री व्यवहार करत आहेत, असे डोंबिवलीतील बारक्या म्हात्रे यांनी सांगितले. दरवर्षी आम्ही मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात विरार भागात जाऊन सुकी मासळी घेऊन कल्याण, डोंबिवली भागांत विक्रीसाठी आणतो. या वेळी करोनाचा संसर्ग वाढल्याने मासेमारीवर परिणाम झाला आहे. विरार, नालासोपारा, वसई पट्टय़ात यंदा सुकी मासळीचे अधिक प्रमाणात उत्पादन झालेले नाही. राज्याच्या विविध भागांतून येथे मासळी व्यापारी खरेदीसाठी येतात. त्यांनी पावसाळ्यासाठी उपलब्ध घाऊक माल उचलला. सुका मासळीचा पुरेसा साठा नाही आणि मागणी अधिक असल्याने विरार, नालासोपारा घाऊक बाजारात सुक्या मासळीचा तुटवडा जाणवत आहे, असे खरेदीदारांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीत घाऊक व्यापाऱ्यांकडून सुकी मासळी खरेदी करून काही रहिवासी आपल्या भागात विक्री करत आहेत, असे जगदीश म्हात्रे यांनी सांगितले.

दर वधारले

सुक्या मासळीच्या पेटीचे (क्रेट) दर मासळीच्या स्तराप्रमाणे दीड हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. हीच मासळी स्थानिक बाजारात किरकोळ पद्धतीने विकताना चढे दर लावूनच विकावी लागते. जो ग्राहक यापूर्वी पाच किलोपासून २५ किलोपर्यंत मासळी भरून ठेवायचा तो या वेळी पाच ते १५ किलोच्या आसपास आला आहे. चढय़ा दरामुळे ग्राहकानेही सुकी मासळी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे, असे कृष्णा पाटील यांनी सांगितले. सुकी मासळी पेटी (क्रेट) किंवा टब (घमेले) यांच्या माध्यमातून विकली जाते. या व्यवहाराला टप्पा म्हटले जाते.

सुकी मासळी दर (टप्पा)

सुके बोंबिल     ८०० रुपये (अर्धा किलो)

मांदिली ५०० रुपये

ढोमेली ६०० रुपये

मध्यम पापलेट ३६०० रुपये (३५० पापलेट)

मोठे पापलेट     १८०० रुपये (दोन तुकडे)

करंदी मासा     ६०० रुपये

दांड मासा       ४०० रुपये