मद्यधुंद अवस्थेत बेफामपणे बस चालवणाऱ्या टीएमटी बसचालकाच्या प्रतापामुळे वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याला आपले प्राण गमावावे लागल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी घोडबंदर मार्गावर राज्य परिवहन सेवेचा बसचालक प्रशांत गेडाम याला मद्याच्या नशेत बस चालवताना ठाणे वाहतूक पोलिसांनी अटक केली आहे.
सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही बस अडविली असून या बसमध्ये सुमारे ४० ते ४५ प्रवासी होते. घोडबंदर येथील गायमुख परिसरात सोमवारी सकाळी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक नीलेश गर्जे वाहतुकीच्या नियमनाचे काम करीत होते. त्यावेळी भाईंदरकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन सेवेचा बसचालक मद्याच्या नशेत बस चालवीत असल्याची माहिती काही वाहनचालकांनी त्यांना दिली. त्याआधारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून त्यांनी अखेर बस अडवून चालकाला ताब्यात घेतले.