शहरात पाणपोई तर आहेत, मात्र त्यात पाणीच नसल्याने या पाणपोयांची घागर मात्र उताणी असल्यासारखी आहे. शिवसेनेच्या वतीने शहरात एका पाणपोईचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या पाणपोईचे पाणी सध्या लगतच असलेल्या एका बगीच्यात फिरविण्यात आले आहे.
उन्हाळा जवळ आला की ठिकठिकाणी थंड पेयांचे स्टॉल, लिंबू सरबतच्या गाडय़ा दिसू लागतात. वाटसरूंना प्रवास करताना तहान लागल्यास त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शहरातील दुकानदार, नागरिक झाडाखाली पाण्याचे मोठे माठ भरून ठेवण्यास सुरुवात करतात.
स्थानिक संस्थांनी डोंबिवली पूर्वेतील स्टेशन परिसरातील बाजीप्रभू चौकात, शिवाजी पुतळ्याजवळ, मानपाडा रोडवरील नाना-नानी उद्यान येथे तसेच औद्योगिक विभागातील एसटी स्टॅण्ड येथे तर पश्चिमेत शास्त्रीनगर येथे एक पाणपोयी असे शहराच्या मुख्य ठिकाणी पाणपोयांची सोय नागरिकांसाठी केली.
मात्र या पाणपोया गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यांची पडझड झाली असून नळही चोरीला गेले आहेत. या पाणपोया खाजगी स्थानिक संस्थांनी उभारल्या खऱ्या, मात्र पुढे त्याची देखभाल, दुरुस्ती झालेली नाही. काही पाणपोयांची पाणी बिले भरली गेली नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने तोडली आहेत.
डोंबिवली पूर्वेतील शिवाजी पुतळ्याजवळ १९९२ साली उभारण्यात आलेली पाणपोई रस्ता रुंदीकरणाच्या कामानंतर पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी गैरसोयीची होऊ लागली. पालिका उपअभियंता राजीव पाठक व अनिरुद्ध सराफ म्हणाले, की पालिकेने पाणपोई उभारलेल्या नाहीत. काही खाजगी पाणपोया शहरात असल्या तरी त्यांच्या देखभालीचे काम खासगी संस्थांचे आहे. पाणी जोडणीसाठी अर्ज आमच्याकडे केल्यास पाणीपुरवठा सुरू करू.