ठाणे : मुंबईपाठोपाठ आता ठाणे महाापलिकेनेही ६० वर्षांपुढील नागरिकांसाठी शहरात ड्राइव्ह इन लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. या मोहिमेचे धोरण लवकरच तयार करून त्याप्रमाणे ती शहरात राबविली जाणार आहे. मात्र, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे शहरातील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात बैठक आयोजित केली होती. महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला पालिका पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुंबईच्या धर्तीवर शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गृहसंकुलातील नागरिकांना खासगी रुग्णालयाशी संलग्न होऊन लसीकरणासाठी मान्यता देण्याबाबत धोरण निश्चिात करणे आणि ६० वर्षापुढील नागरिकांसाठी ड्राइह इन लसीकरण धोरण ठरवून मध्यवर्ती जागा निश्चिात करणे, असा निर्णय घेण्यात आला. ६० वर्षापुढील नागरिकांना ड्राइव्ह इन लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक  आहे.  ही मोहिम कशाप्रकारे  राबवायची याचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नसून त्यांना वाहनामध्येच लस उपलब्ध होणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.