३१ डिसेंबरच्या रात्री ठाणे पोलिसांची कारवाई; मद्यपी चालकासोबत असलेल्या १८८ जणांनाही दंड

ठाणे : नववर्ष स्वागताच्या जल्लोषादरम्यान मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक शाखेने मंगळवारी रात्री जोरदार मोहीम राबवली. ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी १६७३ मद्यपी चालकांवर कारवाई केली असून त्यांचे परवाने सहा महिन्यांसाठी रद्द केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, मद्यपी चालकासोबत प्रवास करणाऱ्या १८८ जणांना दंडही करण्यात आला आहे.

ठाणे, मुंबई परिसरात नववर्ष स्वागतानिमित्त मोठ-मोठय़ा पाटर्य़ाचे आयोजन करण्यात येते. या पाटर्य़ामध्ये सहभागी होणारे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवितात. अशा तळीरामांचा शोध घेण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपासून मुंबई, ठाण्यात नाक्यानाक्यावर वाहतूक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी पहाटे ६ पर्यंत पोलिसांनी १ हजार ६७३ तळीरामांवर कारवाई केली. विशेष म्हणजे, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यासोबत कार किंवा दुचाकीवर असलेल्या १८८ सहप्रवाशांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहनचालक दारू प्यायलेला असतानाही त्याला वाहन चालवू दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यात पोलिसांनी त्यांच्याकडून २ हजार रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे.

मुंब्रा, दिवा, शिळ-डायघर या भागात सर्वाधिक दारू पिऊन वाहने चालविणारे आढळले. या भागात बार, हॉटेलचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे ही कारवाई वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मद्यपी कारवाई आकडेवारी

  •  ठाणे नगर- २७
  • कोपरी- १६
  • नौपाडा- ५७
  • वागळे इस्टेट – १०३
  •  कापुरबावडी- ९७
  • कासारवडवली- २२०
  • राबोडी- २१
  •  कळवा- १०५
  •  मुंब्रा- २७८
  • भिवंडी- ६७
  •  कोनगाव- ५७
  • नारपोली- १२०
  • कल्याण- ५९
  •  डोंबिवली- १३४
  •  कोळसेवाडी- ५६
  •  विठ्ठलवाडी- ६३
  • उल्हासनगर- १०१
  • अंबरनाथ-८१
  • इंटरसेप्टर वाहनाच्या आधारे कारवाई- २
  •  बिनतारी यंत्रणा- ९
  • एकूण- १ हजार ६७३

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १ हजार ६७३ तळीरामांवर कारावाई करण्यात आली आहे. तर, २९ आणि ३० डिसेंबरलाही पोलिसांनी ४७० जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी आरोपींचा वाहन परवाना सहा महिन्यांसाठी रद्द होण्याची शक्यता आहे.

– अमित काळे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा