कारवाईसाठी पोलिसांची नवी शक्कल

वसई-विरार शहरातील बेकायदा गावठी दारूची निर्मिती करणाऱ्या आणि तिची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. मात्र तरी देखील जंगल, खाडी आणि बेटांवर मोठय़ा प्रमाणावर दारूचे अड्डे  कार्यरत आहेत. ते शोधण्यासाठी आता पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचे ठरवले आहे.

राज्य शासनाने हातभट्टीच्या दारूनिर्मितीवर बंदी घातली आहे. मात्र वसई विरार हे अशा दारूंच्या निर्मितीचे केंद्र बनलेले आहे. वसई विरार शहराच्या पश्चिमेला सागरी किनारा आणि पुर्वेला जंगल आहे. घनदाट जंगलाच्या आता आणि खाडीच्या जंगलात मोठय़ा प्रमाणात हे हातभट्टीचे अड्डे सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे दारू माफियांनी आता बेटावर आणि दाट जंगलात स्वत:च्या हातभट्टय़ा लावायला सुरू केल्या आहेत. अनेकदा पोलीस कारवाईला जातात परंतु त्यांना नेमके ठिकाण कळत नाही आणि दारूमाफिया पोलिसांना चकमा देण्यासाठी यशस्वी होतात. यासाठी आता पोलिसांनी दारूच्या हातभट्टय़ांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेर्म्याचा वापर करण्याचे ठरवले आहे.

नेमके ठिकाण कळेल

याबाबत माहिती देताना वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले की, आमची नियमित कारवाई सुरू असते आणि आणि आम्ही लाखो रुपयांचा मालही जप्त केला आहे. परंतु जंगलात आणि बेटावरील अड्डे कारवाईच्या वेळी समजत नाही. त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला तर आम्हाला नेमके ठिकाण समजेल आणि कारवाई करायला सोप्पे जाईल असे ते म्हणाले.