News Flash

आंदोलकांवर ‘ड्रोन’दृष्टी!

महिला पोलिसांना मारहाण करून त्यांचा विनयभंगही करण्यात आला.

पोलिसांना लक्ष्य करण्यात आंदोलनकर्ते आघाडीवर होते.

 

ग्रामस्थांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची युक्तीनेवाळी येथील आंदोलनात सहभागी झालेल्या, पोलिसांना मारहाण तसेच त्यांच्या वाहनांचे नुकसान करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी नेवाळी परिसरातील गावांवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती हिललाइन पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ सूत्राने दिली.

गेल्या आठवडय़ात नेवाळी येथे संरक्षण विभागाच्या ताब्यातील जमीन पुन्हा शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी या भागातील ग्रामस्थ व काही चाळ माफिया यांनी एकत्रितपणे नेवाळी नाका येथे आंदोलन केले. या आंदोलनात पोलिसांना सर्वाधिक लक्ष्य करण्यात आले. पोलीस वाहनांची जाळपोळ करून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान केले. महिला पोलिसांना मारहाण करून त्यांचा विनयभंगही करण्यात आला. हिललाइन पोलीस ठाण्यात सुमारे दीड हजाराहून अधिक जणांवर  पोलिसांनी दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सरकारी कामात अडथळा, विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांना लक्ष्य करण्यामध्ये १३५ आंदोलनकर्ते आघाडीवर होते. त्यांना पहिल्या टप्प्यात पोलिसांनी लक्ष्य केले आहे. या आरोपींमधील तीस जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांची पथके नेवाळी, काकडवाल, भाल, मांगरूळ गावांमध्ये आंदोलनकर्त्यांना अटक करण्यास गेली की, गावकरी संबंधितांना भ्रमणध्वनीवरून सावध करून त्यांना गावातून पळून जाण्यास मदत करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आरोपींना पकडण्यासाठी गावात सतत तळ ठोकून बसणे पोलिसांना शक्य नाही. त्यामुळे आरोपींच्या गावातील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्यांच्या आधारे आरोपींना माग काढणे, त्यांना अटक करणे सहज सोपे होणार आहे, असे सूत्रांनी या वेळी स्पष्ट केले.

शेतातच पकडलो गेलो तर..

भात लागवडीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यात रात्रीअपरात्री पोलीस दारात येत असल्याने या भागातील खरा शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात काम करताना पकडलो गेलो तर अशी भीती येथील ग्रामस्थांना वाटत आहे. बहुतेक आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. राज्यात आपली सत्ता असल्यामुळे आपणास काही सूट मिळेल का, याची चाचपणी स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून काही कार्यकर्ते करीत आहेत. नेवाळी भागातील संशयास्पद हालचाली, गुप्त खलबते यांची माहिती तात्काळ मिळावी, तसेच प्रभावित गावांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 3:17 am

Web Title: drone newali agitation nevali village issue
Next Stories
1 पारसिक बोगद्यावरील रहिवासी अधिकृत?
2 ‘स्वाइन फ्लू’चा ताप वाढला!
3 कुटुंबसंकुल : तंटामुक्त संकुल