ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर आणि तुंगारेश्वर वन परिक्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्याचा निर्णय येऊर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या ड्रोनमुळे वन्य प्राण्यांची शिकार, अनधिकृत बांधकामे, अवैध दारू निर्मिती आणि अवैध वृक्षतोड रोखली जाणार असल्याचा दावा वन विभागातर्फे केला जात आहे.

येऊर हा वन परिसर ठाणे शहराचे फुप्फूस म्हणून ओळखला जातो. येऊरच्या जंगलात मोठय़ा प्रमाणात जैवविविधता आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या जंगलात अनधिकृत बांधकामे सातत्याने उभी राहत आहेत. तर, वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही घडलेल्या आहेत. मात्र, जंगलाचा परिसर मोठा असल्याने वन कर्मचाऱ्यांना या भागात लक्ष ठेवताना मर्यादा येतात. त्यामुळे अनेकदा कारवाया करण्यापूर्वीच आरोपी फरार झालेले असतात.  टाळेबंदी लागू करण्यात आल्यानंतर काही समाजकंटकांकडून या जंगलात बेकायदा वावर सुरू झाल्याचे निदर्शनास आले होते. काही दिवसांपूर्वीच जंगलात वणवे लावण्यात आले होते, याशिवाय दारूभट्टय़ा सुरू करण्यात आल्याचे उघड झाले. तसेच काही भागात अतिक्रमण झाल्याचेही समोर आले. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ३० एप्रिलला मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, येऊर एन्व्हायर्नमेंट सोसायटीचे रोहित जोशी आणि ‘ड्रोन एज’ संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.