14 August 2020

News Flash

पावसाच्या प्रतीक्षेतील दुष्काळग्रस्त परतीच्या वाटेवर

वागळे इस्टेट परिसरातील दुष्काळग्रस्तांच्या छावणीतील चारशेहून अधिक पाहुण्यांनी रविवारी ठाणे शहराचा निरोप घेतला.

वागळे इस्टेट परिसरातील दुष्काळग्रस्तांच्या छावणीतील चारशेहून अधिक पाहुण्यांनी रविवारी ठाणे शहराचा निरोप घेतला. दीड महिन्याच्या वास्तव्यादरम्यान या कुटूंबानी ठाणेकरांचे पाहुणचार आणि प्रेम अनुभवले. शिवाय शहरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये झाडलोट आणि स्वच्छतेची कामे करून रोजगारही मिळवला. पावसाच्या आगमनाच्या आतुरतेने दुष्काळग्रस्तांनी परतीच्या वाटेवरील प्रवास सुरू केला आहे. रविवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीमधून त्यांनी नांदेडच्या मुखेड तालुक्याकडे प्रस्थान केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी त्यांना निरोप दिला.
नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातली दुष्काळग्रस्त कुटुंबे घाटकोपर येथे भटवाडीत राहत होती. उघडय़ावरचा निवास, खाण्यापिण्याची, राहाण्याची आणि शौचालयासारख्या मुलभुत सोयीची वानवा असल्याने त्यांची स्थिती अतिशय वाईट होती. ही माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी भेट दिली व त्यांना ठाण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. वागळे इस्टेट येथील एमआयडीसी मैदानावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दुष्काळग्रस्त छावणी उभी करण्यात आली. ही छावणी मुंबई विभागातील दुष्काळग्रस्थांसाठीची पहिली छावणी ठरली. या छावणीत तीनशे कुटूंबातील सुमारे चारशे दुष्काळग्रस्त दीड महिना इथे राहिले. त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रोजगारही मिळवून देण्यात आला. त्यामुळे परतीच्या प्रवासादरम्यान त्यांच्या गाठीला चार पैसे उपलब्ध होऊ शकले. दुष्काळग्रस्त म्हणून येण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये, हीच सदिच्छा आहे, असे शिंदे यांनी निरोप देताना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2016 12:12 am

Web Title: drought affected people back to home
टॅग Drought
Next Stories
1 ठाण्यातील रस्ते दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
2 काळजाचा ठोका आजही चुकतोय!
3 प्रोबेस कंपनीमधील ढिगारे उपसण्याचे काम पूर्ण
Just Now!
X