19 April 2019

News Flash

वसई पालिकेत औषध घोटाळा

आरोग्य विभागातील ढिसाळपणा समोर आला असतानाच औषध खरेदीत अनियमितता असल्याचे उघड झाले आहे.

प्रत्यक्ष खरेदी आणि वापर यांच्यात तफावत
वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट आणि आरोग्य विभागातील ढिसाळपणा समोर आला असतानाच औषध खरेदीत अनियमितता असल्याचे उघड झाले आहे. लेखापरीक्षण अहवालात या अनियमिततेबद्दल ताशेरे ओढण्यात आले आहेत. शिवसेनेने हा मोठा औषध घोटाळा असून मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.
पालिकेचे रुग्णालय आणि इतर दवाखाने यांच्यासाठी लागणारी विविध प्रकारची औषधे संबंधित रुग्णालयाने केलेल्या मागणीनुसार खरेदी केली जातात. ही औषधे खरेदी केल्यानंतर मुख्य भांडार विभागाकडून त्याबाबतची नोंद महाराष्ट्र नगरपरिषदा लेखासंहितेच्या नियमानुसार ठेवणे बंधनकारक असते. मात्र असे असतानाही नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या २०१३-१४च्या लेखापरीक्षण अहवालानुसार लेखापरीक्षकांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या पारनाका, वसई येथील सर डी. एम. पेटीट रुग्णालय यांमध्ये औषधे पुरविलेल्या साठय़ाची नोंद अयोग्य पद्धतीने केलेली आहे. नोंदवही तपासली असता औषधांचे मिळालेले नग, त्यापैकी वापर केलेले नग आणि प्रत्यक्ष शिल्लक राहिलेले नग यांमध्ये तफावत आढळून आली आहे. प्रत्यक्षात तफावत असलेले नग हे कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या ठिकाणी वापरण्यात आले आहे याची माहितीही देण्यात आलेली नाही.
विशेष बाब म्हणजे साठा नोंदवहीमध्ये अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे या प्रकरणात अनियमितता झाल्याचे लेखापरीक्षकांनी सांगितले.

* साठा नोंदवहीनुसार दवाखाना विभागास शक्यतो गरोदर महिलांसाठी देण्यात येणाऱ्या ‘इंजेक्शन आयर्न सुक्रो’ या औषधांचे १ हजार ३८२ नग प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ ८६ नग वापरण्यात आले. १ हजार २९६ नग शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र या ठिकाणी केवळ ७९६ नग शिल्लक होते. म्हणजेच ५०० नगांची तफावत आढळून आली.
* वॅक्सिन अे.आर.व्ही. या औषधाचे ३५३ नग प्राप्त झाले. त्यापैकी २५३ नग वापरण्यात आले. या औषधांचे १०० नग शिल्लक राहणे अपेक्षित होते. मात्र त्या ठिकाणी शिल्लक नग आढळून आले नाहीत. म्हणजेच १०० नगांची तफावत आढळून आली.

एकीकडे सर डी. एम. पेटीट रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना खासगी औषधविक्री दुकानांतून औषधे खरेदी करावी लागत आहेत, तर दुसरीकडे भांडार विभागाचे व आरोग्य विभागाचे अधिकारी याच रुग्णालयातील औषधसाठा संगनमताने बेपत्ता करत आहेत. या प्रकरणात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
– धनंजय गावडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख.

आरोग्य विभागावर केलेले हे आरोप बिनबुडाचे आहेत. नोंदीत तफावत आढळली म्हणजे घोटाळा झालेला नाही. सर्व रुग्णांना नियमित औषधे मिळत आहेत.
– डॉ. अनुपमा राणे, आरोग्य अधिकारी.

First Published on April 27, 2016 5:14 am

Web Title: drug scams in vasai virar municipal corporation