News Flash

तपासचक्र : अमली पदार्थ तस्करीचा ‘शिक्षक’

शिक्षकीपेशामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि समाजातील परिचितांकडून मानसन्मान मिळत होता.

शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना तो इंग्रजी विषय शिकवतो.

कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात ओम दत्तात्रेय धाम नावची इमारत आहे. या इमारतीत अशोक भीषण डोंगरे हा कुटुंबासोबत राहतो. डीएड केल्यानंतर त्याने शहापूरमधील एका शाळेत नोकरी मिळवली. या शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना तो इंग्रजी विषय शिकवतो. शिक्षकीपेशामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि समाजातील परिचितांकडून मानसन्मान मिळत होता. एकूणच अशोकचं आयुष्य व्यवस्थित वाटेवर चाललं होतं.
एकेदिवशी अशोक आणि त्याचे मित्र भेटले असताना गप्पांच्या ओघात सहलीला जाण्याचा विषय निघाला. अनेक ठिकाणांवर चर्चा झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला जाण्यावर एकमत झाले आणि ठरल्याप्रमाणे ही मित्रमंडळी काश्मीर पर्यटनालाही गेली. मात्र एका ठिकाणी राहण्याची व्यवस्था होत नसल्याने त्यांची थोडीशी गैरसोय झाली. त्या वेळी त्या गावातील रामू (बदललेले नाव) नावाच्या सरपंचाने त्यांची राहण्याची व्यवस्था करून दिली. या घटनेनंतर अशोक आणि रामू यांच्यात चांगली मैत्री जुळली. मुंबईला परतल्यानंतरही अधूनमधून त्याचे दूरध्वनीवरून रामूसोबत बोलणे होत होते.
रामूच्या बहिणीला कर्करोगाचा आजार जडल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. पण तिथे तिची प्रकृती चिंताजनक होऊ लागली होती.अखेर त्याने तिला मुंबईमधील रुग्णालयात आणले. परंतु मुंबई शहरात कोणीच ओळखीचे नातेवाईक नसल्यामुळे त्याने अशोकला मदतीसाठी बोलावून घेतले. तसेच या काळात तो अशोकच्या घरी राहिला. यामुळे त्यांच्या मैत्रीतील नाते अधिक घट्ट झाले आणि तीच अशोकच्या अध:पतनाची सुरुवात होती.
सरपंच असलेला रामू छुप्या पद्धतीने चरस-गांजा विक्रीचा धंदा करत असे. अशोकशी घनिष्ठता निर्माण झाल्यानंतर त्याने अशोकलाही आपल्या या व्यवसायाची माहिती दिली आणि अधिक पैसा कमवण्याची लालूचही दाखवली. पैशांचा मोह शिक्षक असलेल्या अशोकलाही सुटला नाही आणि त्याने रामूच्या अमली पदार्थ तस्करीच्या व्यवसायात शिरकाव केला. तो मुंबईहून काश्मीरला कार घेऊन जायचा. मात्र २०१२ मध्ये मुंबई पोलिसांच्या अमली विरोधी पथकाने त्याला अशाच प्रकरणात अटक केली. मात्र जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतरही अशोकने आपला तस्करीचा उद्योग सुरूच ठेवला.
चार महिन्यांपूर्वी डोंबिवलीमधील ठाकुर्ली भागात अशोक आणि त्याचा साथीदार संजय शंकर पाटील हे दोघे एका कारमधून चरस विक्रीसाठी घेऊन जाणार होते. त्याची माहिती ठाणे अमली विरोधी पथकाला खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी विशेष पथकामार्फत ठाकुर्ली परिसरात सापळा लावला. विशेष पथकात पोलीस उपनिरीक्षक ए. एस. वालझाडे, पोलीस कर्मचारी दिलीप सोनावणे, तुलशीराम पोपळे, महादेव चाबुकस्वार यांचा समावेश होता. या पथकाने सापळा रचून मोठय़ा शिताफीने अशोक आणि त्याचा साथीदार संजयला पकडले. त्या वेळी दोघांच्या अंगझडतीमध्ये तसेच कारच्या तपासणीत तब्बल १२ किलो चरस सापडला होता. त्याची बाजारभावाप्रमाणे सुमारे १२ लाख रुपये इतकी किंमत आहे. तसेच संजय याच्याकडे त्याचा फोटो असलेले शासकीय ओळखपत्र तसेच वेगवेगळे १९ शिक्के सापडले होते. पथकाने त्याच्या ओळखपत्राची खात्री केली, त्यामध्ये ते बनावट असल्याचे उघड झाले. अमली पदार्थाच्या तस्करीदरम्यान पकडले जाऊ नये म्हणून त्याने शासकीय बनावट ओळखपत्र बनविले होते. तपासादरम्यान रामू हा अशोकला अमली पदार्थाचा साठा पुरवीत असल्याची माहिती पुढे आली. यामुळे पोलीस उपनिरीक्षक ए. एस. वालझाडे यांचे पथक तातडीने जम्मूला रवाना झाले, मात्र तिथे तो त्याच्या हाती लागला नाही. यामुळे पथकाकडून त्याचा माग काढण्याचे काम आजही सुरू आहे. तर या गुन्ह्य़ात अशोक आणि संजयला अटक झाली असून त्यांची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2016 2:30 am

Web Title: drug trafficking mastermind
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : कॉमिक्सपासून किंडलपर्यंत
2 सुटीच्या दिवशी पाण्यालाही सुटी!
3 देखभालीमुळे जागा अतिक्रमणमुक्त
Just Now!
X