सार्वजनिक ठिकाणी ब्राऊन शुगर, एमबी, चरस, गांजाचे सेवन

कल्याण, डोंबिवलीतील अनेक तरुण अमली पदार्थाच्या विळख्यात अडकले आहेत. शहरातील गल्लीबोळ, खाडीकिनारे, उड्डाणपूल, झुडपे, झोपडपट्टय़ांत अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांची टोळकी आडोसा शोधून बसलेली दिसतात. पोलीसही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात सकाळपासून अनेक तरुण, तरुणी बंदिस्त क्रीडागृह आणि तरण तलावांच्या कोपऱ्यांत बसलेले असतात. रात्री तर या क्रीडा संकुलाला अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांच्या अड्डय़ाचे रूप येते. लहान शेकोटय़ा पेटवून त्याभोवती हे व्यसनाधीन तरुण बसलेले दिसतात. फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्यांची त्यामुळे गैरसोय होते.

क्रीडा संकुलातील सुविधेचे काम पाहणाऱ्या एका ठेकेदाराने येथील काही तरुणांना अश्लील प्रकार व अमली पदार्थाचे सेवन करू नका, असे सांगितले असता, त्यांनी त्याला दमदाटी केली. यात काही तरुणींचाही समावेश होता, असे ठेकेदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. ‘रोज क्रीडासंकुलात यावे लागते, त्यामुळे त्यांच्याशी रोज कोण भांडण करणार,’ असा प्रश्न या ठेकेदाराने केला. ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील सेल्फी कट्टा, पत्रीपूल ते खंबाळपाडा, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाबाहेरील खाडीकिनारा भागात रात्री अनेक टोळकी जमतात. संध्याकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत स. वा. जोशी शाळा व गणेश मंदिरादरम्यानच्या टेम्पो वाहनतळाच्या आडोशाला अनेक जण बसतात आणि अमली पदार्थाचे सेवन करतात, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. डोंबिवलीतील सर्वेश सभागृह ते मानव कल्याण केंद्रादरम्यान असलेल्या गल्लीमध्ये तरुणांचा अधिक वावर असतो. या ठिकाणी पोलिसांनी पाळत ठेवावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा जेटी, मोठागाव रेतीबंदर खाडी किनारा, कल्याणमधील आधारवाडी भागातील गंधारे उड्डाणपूल भागात अमली पदार्थ सेवन करण्यासाठी अनेक तरुण आपल्या महागडय़ा दुचाकी घेऊन येतात.

अमली पदार्थाच्या नशेत ते अनेक गैरप्रकार करतात. डोंबिवली पश्चिमेत अशाच एका तरुणांच्या टोळक्याने एका मुलीचे अपहरण करून तिच्याशी अनैतिक वर्तन केले होते. बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी या प्रकरणात न पडण्याचा मार्ग स्वीकारला. विष्णुनगर पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते; पण, ते दाबल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहरवासीय या प्रकारांचा त्रास होत असताना पोलीस कारवाई करत नसल्यामुळे गस्ती पथके, विशेष पथक काय करते, असा प्रश्न रहिवासी करत आहेत.

जखमेवरील मलमे, व्हाईटनर, ब्राऊन शुगर, एमबी, चरस, गांज्याचे व्यसन लागलेल्यांचे प्रमाण वाढले आहे. ब्राऊन शुगरचा पुन्हा वापर होत असल्याचे समजते. व्यसनाधीनता वाढत आहे.

डॉ. दुष्यंत भादलीकर, मानसोपचारतज्ज्ञ

डोंबिवली परिसरात अशी काही ठिकाणे असतील तर, त्यांची तात्काळ पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

रवींद्र वाडेकर, साहाय्यक पोलीस आयुक्त

क्रीडासंकुलाच्या सुरक्षेची जबाबदारी भांडुपच्या खासगी सुरक्षा एजन्सीकडे आहे. गैरप्रकारांची गंभीर दखल घेण्यात येईल. मुख्य सुरक्षा रक्षक सुरेश पवार यांनाही सूचना देण्यात येतील.

भरत बुळे, साहाय्यक सुरक्षा अधिकारी, कडोंमपा