पोलीस तपासात उघड; मुख्य आरोपी फरार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर स्थानिक गुन्हे शाखेने तलासरीच्या दापचेरी येथून जप्त केलेले ४० कोटींचे अमली पदार्थ कामोत्तेजक औषधे बनवण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी वसई-विरारमधील अमली पदार्थाचे सर्व अड्डे शोधले असून त्यावर लवकरच कारवाई करून बंद केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वसई-विरारमध्ये मोठय़ा प्रमाणावर अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ सप्टेंबर रोजी सलीम मेमन याच्यासह तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून २१ किलोचे इफ्रिडीन हे अमली पदार्थ जप्त केले होते. याच तपासात पोलिसांनी दापचेरी दुग्ध प्रकल्पाच्या एका फार्महाऊसवर छापा टाकला. या छाप्यात साडेपाच हजार किलो हेरॉइन, २४ किलो आयसोसॅफरॉल आणि नऊ  किलो केटामाईन हे अमली पदार्थ जप्त केले. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ४० कोटी रुपये आहे. या टोळीचा म्होरक्या फैयाज खान असल्याचे निष्पन्न झाले असून तो फरार झाला आहे. पोलीस पथके त्याच्या मागावर आहे.

हैदराबाद येथून हे अमली पदार्थ दापचेरी येथे आणली जात होती. दापचेरी येथील आडबाजूला असलेल्या फार्महाऊसवर या अमली पदार्थावर प्रक्रिया केली जात होती. सलीम मेमन हा आरोपी तिथून अमली पदार्थ विकत घेऊन वसईत इतर विक्रेत्यांकडे (पेडलर) विकत होता. इफ्रिडीन या अमली पदार्थापासून लैंगिक उत्तेजना वाढवणारी औषधे तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. परदेशात त्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे नायजेरियन आणि इतर परदेशी नागरिकांना हे इफिड्रिन विकले जात होते. फैयाज खान हा या अमली पदार्थाच्या रॅकेटचा म्होरक्या असून यापूर्वी त्याला हैदराबादमधील पोलिसांनी अटक केली होती.

वसई आणि विरारमध्ये अनेक ठिकाणी अमली पदार्थाचे अड्डे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. हे सर्व अड्डे पोलिसांच्या रडारवर असून लवकरच हे सर्व अड्डे उद्ध्वस्त केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांचा विशेष सत्कार

पोलीस नाईक सचिन दोरकर यांनी ही गुप्त माहिती आणल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांघी, सचिन दोरकर, मनोज मोरे, प्रदीप पवार आदींचा पोलीस प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drugs using for aphrodisiac medicines in palghar
First published on: 06-10-2017 at 03:17 IST