डोंबिवलीतील जागृत नागरिकाची संकल्पना
पाच वर्षांत जमले नाही ते येत्या चाळीस दिवसांत करून दाखविण्याच्या घोषणा करत महापालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांनी मतदारांना आमिषे दाखवून भुलविण्याचा उद्योग सुरू केला आहे. काही काळ मिळणाऱ्या या सुविधा तात्पुरत्याच असतात. निवडणुका संपल्या की मतदार नागरिकांना कोणीही विचारत नाही. योग्य उमेदवार पालिकेत निवडून न गेल्याने त्याचे चटके शेवटी शहराला बसतात. हे टाळण्यासाठी आपल्या प्रभागातील योग्य उमेदवार मतदारांनीच निवडावा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. या जनजागृतीसाठी डोंबिवलीत एका जागरूक नागरिकाने ‘नगारा आंदोलन’ सुरू केले आहे.निवडणुकीच्या तोंडावर नेहमीच जनजागृती, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या राजन मुकादम यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. गुरुवारी सकाळी डोंबिवलीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून इच्छुक उमेदवार, नगरसेवकांनी नागरिकांना आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रभागातील इमारतींवरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून देणे. दगड मातीचे रस्ते करून देणे, केबलची मोफत सुविधा देणे, मुबलक पाणी सोसायटीत असताना टँकरने पाणीपुरवठा करून देणे, गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव मंडळांना भरगच्च वर्गणी देऊन त्यांना ‘बांधून’ ठेवण्यात येत आहे. आधारकार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, सरकारी कार्यालयातील विविध प्रकारचे दाखले मिळून देण्यासाठी प्रयत्न करणे, असे उद्योग इच्छुक उमेदवारांनी, माजी नगरसेवक, नगरसेवकांनी सुरू केले आहेत.या मिळणाऱ्या सगळ्या सुविधा औट घटकेच्या आहेत. या माध्यमातून तात्पुरती नागरिकांची सोय होते. ठरावीक भागाला सुविधा मिळते. या सुविधा देणाऱ्या उमेदवाराच्या आमिषांना बळी पडून एखादा पात्रता नसलेला गुंड प्रवृत्तीचा उमेदवार पालिकेत निवडून जातो. तेथे जाऊन फक्त टक्केवारीचे राजकारण करतो. तो शहर हिताच्या विकास प्रकल्पांकडे लक्ष देत नाही. गेल्या अनेक वर्षांत हेच घडून आले. म्हणून कल्याण डोंबिवली शहरे विकासापासून दूर राहिली. याचा नागरिकांनी विचार करून उमेदवारांकडून मोफत मिळणाऱ्या औट घटकेच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन राजन मुकादम यांनी नगारा आंदोलनातून केले आहे.

कोणतीही निवडणूक आली की ते पैसे कमविण्याचे साधन आहे, असे अलीकडे समजले जाते. आतापर्यंत झोपडपट्टीतील मते विकत घेतली जात होती. सुस्थितीमधील कुटुंबे, सोसायटय़ाही उमेदवारांकडून सोसायटीतील कामे करून घेतात आणि दिलेल्या आमिषाला बळी पडून खुशाल त्याला निवडून देतात. आपण निवडून दिलेला उमेदवार कोण, त्याची पात्रता काय याचा कोणताही विचार केला जात नाही. हे कोठेतरी थांबावे. नागरिकांनी उमेदवार, नगरसेवकांकडून मिळणाऱ्या तात्पुरत्या आमिषांना बळी पडू नये. यासाठी आपण हे नगारा आंदोलन सुरू केले आहे. लोकांमध्ये जागृती करणे हाच आपला उद्देश आहे. -राजन मुकादम, नगारा आंदोलनप्रमुख