News Flash

हाजीमलंगच्या पायथ्याशी पुन्हा रसायनांचे पिंप

विल्हेवाट लावण्याच्या हेतूने फेकल्याचा प्रकार

विल्हेवाट लावण्याच्या हेतूने फेकल्याचा प्रकार

अंबरनाथ : कंपन्यांतून उत्पादन प्रक्रियेनंतर निघणाऱ्या रासायनिक कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावता हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी या द्रवरूप कचऱ्याचे पिंप फेकण्यात आल्याचे आढळून आले. येथील कुशिवली गावाच्या हद्दीत रसायनांनी भरलेले सुमारे सव्वाशे पिंप आढळून आले असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे सुमारे ४५० रासायनिक कचऱ्याचे पिंप अंबरनाथ तालुक्यातील करवले गावात जमिनीत पुरण्यात आल्याचे समोर आले होते. असाच प्रकार पुन्हा या परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.  दोन-तीन दिवसांपूर्वी कुशिवली गावापासून जवळच हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी रसायनांचे पिंप आणून टाकले जात असल्याची माहिती काही दक्ष नागरिकांना मिळाली होती. याबाबत त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना माहिती देताच हिललाइन पोलाीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत येथे रसायनांचे पिंप आणण्याचा ट्रकचालक, व्यवस्थापक आणि दोन मजूर अशा चौघांना ताब्यात घेतले. या वेळी घटनास्थळी सुमारे १०० रसायनांनी भरलेले पिंप आढळून आले. त्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये ३० ते ३५ पिंप सापडले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत पिंपांमधील रसायनांचे नमुने संकलित केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी सांगितले. यातील १० पिंप फोडलेल्या अवस्थेत असल्याने त्याचा दर्प पसरू लागला होता.  या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे. हा रासायनिक कचरा येथे कुठून आणि का आणला याचीदेखील तपासणी सुरू आहे.

पायथा प्रदूषित

हाजीमलंग डोंगराच्या पायथ्याशी मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. तीन वर्षांपूर्वी सापडलेले रसायनांचे ४५० पिंप आणि आताची घटना याचे उदाहरण आहे. उल्हासनगरमधील अनेक जिन्स धुलाई कारखाने या परिसरात स्थलांतरित होत आहेत. स्थानिक ग्रामस्थ अवघ्या काही पैशांसाठी जमिनी अशा प्रदुषणकारी व्यक्तींना भाडेतत्त्वावर देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 2:51 am

Web Title: drums of chemicals again at haji malang zws 70
Next Stories
1 ठाण्यात आज पालिकेच्या एकाच केंद्रावर लसीकरण
2 डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे निधन
3 “माझा नवरा मंत्री असला तरी…,” ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीकडून धरणं आंदोलन; व्यक्त केला संताप
Just Now!
X