दारूच्या नशेत बेफामपणे कार चालविणाऱ्या ठाणे पोलीस दलातील पोलीस नाईक पुरुषोत्तम धोंडिबा आयातराम याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री समतानगर भागात घडली. या अपघातातून दोन तरुण सुदैवाने बचावले असून त्यापैकी एक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी आयातराम याला अटक केली असून, न्यायालयात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
ठाणे येथील समतानगर परिसरात पुरुषोत्तम आयातराम हा राहतो. तो ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत आहे. मंगळवारी रात्री तो घरी परतत असताना कार वेगाने चालवीत होता. त्यावेळी त्याने समतानगर परिसरातील एका दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर कार लोखंडी गेटवर जाऊन आदळली. या अपघातात शैलेंद्र जयस्वाल हे जखमी झाले. शैलेंद्र यांचे समतानगर परिसरात दुकान असून मंगळवारी रात्री दुकान बंद करून ते मित्र शिवकुमार यांच्यासोबत परिसरात गप्पा मारत उभे होते, त्यावेळी हा अपघात झाला. यामध्ये कारची धडक बसून शैलेंद्र जखमी झाले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली. दरम्यान, पोलीस नाईक पुरुषोत्तम हा दारूच्या नशेत कार चालवत असताना हा अपघात झाल्याची माहिती वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांनी दिली.