क्रिकेटप्रेमी तळीरामांचा अवेळी धिंगाणा, फटाक्यांची आतषबाजी
मुंबई, ठाण्यापासून जवळ असलेल्या निसर्गरम्य येऊर परिसरातील बंगले वा हॉटेलांमध्ये येऊन पाटर्य़ा करणाऱ्यांची संख्या एरव्हीही जास्त असते. परंतु नुकत्याच संपलेला क्रिकेट विश्वचषक आणि त्यापाठोपाठ सुरू झालेली आयपीएल स्पर्धा यामुळे सध्या हा संपूर्ण परिसर दणाणून जात आहे. क्रिकेटच्या सामन्यांचा मोठय़ा पडद्यावर आनंद घेतानाच मद्यपाटर्य़ा करण्यासाठी येऊर परिसरात मोठी गर्दी होऊ लागली आहे. या पाटर्य़ामधील तळीरामांचा धिंगाणा आणि सामन्यांनंतर होणारी फटाक्यांची आतषबाजी यामुळे या निसर्गरम्य परिसराची शांतता संपुष्टात आली आहे. मात्र, वनविभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
येऊरमधील पर्यावरणाला धक्का पोहचू नये यासाठी तळीरामांविरोधात सातत्याने कारवाई करत असल्याचे चित्र वन विभागाकडून रंगविले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी पाटर्य़ा आणि कर्णकर्कश संगिताने अक्षरश: टोक गाठले असल्याच्या तक्रारी पर्यावरण संस्था करत आहेत. बेशीस्त नागरिकांच्या या बेसुमार वर्तनामुळे प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहचत आहे. यासंबंधी येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीने वन विभागाकडे काही तक्रारी नोंदविल्या आहेत. विशेषत: गेल्या महिन्यात भारतात पार पडलेली ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धा आणि सध्या सुरू असलेले आयपीएलमधील सामने पाहण्यासाठी येथील हॉटेलात जमणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सामने पाहताना मद्यप्राशन करणाऱ्यांकडून धिंगाणा होतो. याशिवाय फटाके फोडणे, दारू पिऊन वाहने चालवणे, मोठय़ा आवाजात हॉर्न वाजवणे, वाहनांमध्ये संगीत लावणे, रस्त्यावर नाचणे यासारखे प्रकार येथे घडत आहेत. या परिस्थितीला आळा बसावा यासाठी येऊर पर्यावरण सोसायटीने वनखात्याकडे केलेल्या तक्रार अर्जात काही मागण्या केल्या आहेत. सायंकाळी सहानंतर गावक ऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त पर्यटकांना तसेच वाहनांना प्रवेशबंदीचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच महत्त्वाच्या क्रिकेट सामन्यांच्या वेळी मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल्सबाहेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त वाढवावी आणि फटाके फोडले जाणार नाहीत याची शाश्वती द्यावी, असेही येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीचे मागणे आहे. परंतु वनविभागाने याची दखल घेतली नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सातत्याने येऊर परिसरात होणाऱ्या घातक कृत्यांबाबत वन विभागाकडे माहिती दिली जाते. सदर केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्याची हमी वनअधिकाऱ्यांनी दिल्यास येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीतर्फे संपूर्णत: सहकार्य केले जाईल.
– रोहित जोशी, येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटी संयोजक

येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीने दाखल केलेल्या मागणी अर्जानुसार कारवाई करण्यासाठी वनविभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात हमीपत्र लवकरच येऊर एन्व्हार्यमेंटल सोसायटीकडे देण्यात येणार आहे. नागरिकांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठीच्या सूचना या वनविभागातर्फे देण्यात येणार आहेत.
– संजय वाघमोडे, परिक्षेत्र वनअधिकारी.