22 January 2018

News Flash

जीएसटीमुळे सुका मेवा फिका!

सुक्या मेव्याची किंमत ही त्यांचा आकार आणि गुणवत्तेनुसार वेगवेगळी आहे.

चंद्रकांत दडस/ अक्षय मांडवकर | Updated: October 11, 2017 5:08 AM

दिवाळीच्या फराळामध्ये सुक्या मेव्याचा वापर हमखास केला जातो.

दरांत वाढ झाल्याने मागणीत घट; दिवाळीत भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या पाकिटांवरही संक्रांत

मुंबई : दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी परस्परांना भेटवस्तू देण्यापेक्षा सुक्या मेव्याची पाकिटे भेट देण्याची प्रथा अलीकडच्या काळात रूढ झाली आहे. परंतु, यंदा या परंपरेला काहीशी खीळ बसण्याची शक्यता आहे. काजू, बदाम, खारीक, अक्रोड या जिन्नसांवर लागू झालेल्या वस्तू आणि सेवा करामुळे (जीएसटी) सुक्या मेव्याचे दर वाढले आहेत. परिणामी यंदा सुक्या मेव्याच्या मागणीत घट झाली असून विविध कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना सुक्या मेव्याची पाकिटे भेट म्हणून देण्याच्या पद्धतीवरही याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

दिवाळीच्या फराळामध्ये सुक्या मेव्याचा वापर हमखास केला जातो. पण यासोबतच सुका मेवा भेट म्हणून देण्यालाही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दिवाळीच्या हंगामात वाशी आणि मस्जिद बंदर येथील घाऊक बाजारात किरकोळ विक्रेत्यांसह, ग्राहकांचीही खरेदीसाठी गर्दी उसळते. परंतु, यंदा हे चित्र अद्याप दिसत नाही. दिवाळी आठवडाभरावर येऊन ठेपली असतानाही सुक्या मेव्याची मागणी २५ टक्क्यांनी कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘या काळात आम्हाला एकमेकांशी बोलण्याचीही फुरसत नसते. परंतु, यंदा मात्र मागणी नसल्याने निवांत बसण्याखेरीज आमच्याकडे पर्याय नाही,’ असे वाशी बाजारातील सुक्या मेव्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले. सुक्या मेव्याच्या किमतीत दरवर्षी होणारी वाढ नित्याचीच असली तरी त्यावर आकारण्यात येणाऱ्या जीएसटीमुळे हे दर आणखी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी काजू, बदाम यांच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सुक्या मेव्याची किंमत ही त्यांचा आकार आणि गुणवत्तेनुसार वेगवेगळी आहे. बदामावर १२ टक्के, काजूवर ५ टक्के व इतर प्रकारांवरही जीएसटी लागत आहे. सुक्या मेव्याच्या विविध प्रकारांवरील जीएसटी आणि त्याने भरलेल्या भेटवस्तूंच्या डब्यांवर असलेला १८ टक्के जीएसटी यामुळे किंमत वाढल्याची माहिती मशीद बंदर येथील ‘केसर डॉयफूट्र’चे मालक अस्लम यांनी दिली. गेल्या वर्षी सुक्या मेव्याच्या पाच प्रकारांनी भरलेल्या डब्यासाठी ५०० ते ७०० रुपये मोजावे लागत होते. मात्र यंदा याच डब्यासाठी  ७०० ते १००० रुपये मोजावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय सुटय़ा स्वरूपात मिळणाऱ्या सुक्या मेव्याच्या किमतीही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे ‘ओसवाल डॉयफूट्र’चे मालक नरेश शहा यांनी सांगितले.   देशभरातून तसेच परदेशांतून सुका मेवा वाशीच्या घाऊक बाजारात आला असून मुंबईतील किरकोळ तसेच घाऊक बाजारात हा माल विक्रीसाठी आणला जात आहे. अफगाणिस्तानातून बदाम, कोकणातून काजू व चारोळी, अरब प्रांतातून खारीक आणि अंजीर व दक्षिण भारतातून वेलची, जायफळ यांची आवक दरवर्षी होते. मशीद बंदर येथे घाऊक स्वरुपातील सुका मेवा विक्रीचा मोठा बाजार आहे. याठिकाणी पिस्ता, बदाम, काजू, खारीक, चारोळी, मनुके,अंजीर, अक्रोड यांसारखा मेवा सुटय़ा तसेच मिश्र स्वरुपात उपलब्ध आहेत.

दिवाळीमध्ये सुक्यामेव्याची खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणात होते. मात्र दिवाळी जवळ आली असतानाही अद्याप ६० टक्के माल शिल्लक आहे. बाजारातून सुक्या मेव्याला उठाव नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने तीन महिन्यातून एकदा कर विवरणपत्रे भरण्याची सूट दिली असली तरी ऑनलाइन समस्येमुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास आणखी काही महिने लागतील. 

-एच. एस ट्रेडर्स, वाशी

सध्या अक्रोड भारतासह काश्मीर आणि चिलीमधून येत आहे. त्यामुळे भारतातील अक्रोडची मागणी कमी झाली आहे. अक्रोडची विक्री मागील वर्षांच्या तुलनेत ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. मोठय़ा कंपन्या तसेच किरकोळ व्यापाऱ्यांकडून मागणी नसल्याने माल पडून आहे. वस्तू आणि सेवा कर तसेच निश्चलनीकरणाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. 

-एन. ए.ट्रेडर्स, वाशी

First Published on October 11, 2017 4:54 am

Web Title: dry fruits market badly suffer by gst
  1. Purushottam Dayama
    Oct 11, 2017 at 7:58 pm
    Acrode chya vikrit nischanikarnacha kasa prabhav padla te sangitale nahi. Uthsut Modi aani Nischalinikarnawar tika karnyache kaam chalu aahe.
    Reply