कळव्याचा ब्रिटिशकालीन पूल वाहतूक कोंडीवर पर्याय
ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या नवीन खाडी पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतुकीचे नियोजन आखण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शंभर वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून दुचाकी, तीनचाकी आणि कार अशा वाहनांची दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे, मात्र ब्रिटिश सरकारच्या पत्रानुसार या पुलाचे आयुर्मान संपलेले असल्यामुळे दोन्ही विभागापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे डागडुजी करून हा पुल दुहेरी वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो का, याची चाचपणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे.
सुमारे शंभर वर्षे जुना झालेला ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस कमी पडू लागल्याने सुमारे २० वर्षांपूर्वी कळवा खाडीवर नवीन पूल उभारण्यात आला. त्या वेळी दोन्ही पुलांवरून वाहतूक सुरू होती. मात्र, सप्टेंबर २०१०मध्ये जुन्या पुलाच्या कमानीचे काही दगड निखळून पडले. तसेच ब्रिटिश सरकारनेही या पुलाचे आयुर्मान संपल्याचे ठाणे महापालिकेला कळवले. त्यामुळे हा पूल बंद करण्यात आला. मात्र, यामुळे नवीन पुलावर वाहतुकीचा ताण वाढू लागल्याने ब्रिटिशकालीन पूल रिक्षा आणि दुचाकींच्या एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू असली तरी दुसऱ्या खाडी पुलावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी झालेली नाही.
या पाश्र्वभूमीवर महापालिकेने आता तिसऱ्या नवीन खाडी पुलाचे नियोजन केले असून त्या पुलाचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या पुलाच्या कामासाठी रस्त्यांच्या मध्यभागी मोठे खांब उभारण्यात
येणार आहेत. या कामामुळे ठाणे आणि कळवा अशा दोन्ही बाजूकडील वाहतूक कोंडीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आणि पोलिसांनी या भागातील वाहतुकीचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शंभर वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून दुहेरी दुचाकी, तीनचाकी आणि कार अशा वाहनांची वाहतूक सुरू करण्याचा दोन्ही विभागाचा विचार आहे. मात्र, ब्रिटिश सरकारच्या पत्रानुसार या पुलाचे आयुर्मान संपलेले असल्याने दोन्ही विभागांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, तिसऱ्या खाडी पुलाच्या कामामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी ब्रिटिशकालीन पुलाची पुन्हा एकदा पाहणी करण्यात येणार आहे. या पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाली तर दुसऱ्या पुलावरील वाहतुकीचा ताण काहीसा कमी होऊ शकणार आहे.