24 January 2020

News Flash

दिवावासीयांचा पैसा पाण्यात!

ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या दिवा शहरात तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे.

अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे टँकरच्या पाण्यावर मदार; एका कुटुंबाला दरमहा सात हजार रुपयांचा खर्च

ऋषिकेश मुळे-आशीष धनगर

ठाणे : बेकायदा बांधकामांतील अनधिकृत नळजोडणीमुळे कमी दाबाने होत असलेल्या पाणीपुरवठय़ाचा परिणाम आता दिवावासीयांच्या खिशावरही होऊ लागला आहे. नेहमीच पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या या शहरात सध्या अतिशय भीषण पाणीटंचाई असून नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. जवळपास रोजच टँकरमधील पाणीखरेदी करावे लागत असल्याने जवळपास प्रत्येक कुटुंबाला महिनाकाठी सात ते आठ हजार रुपये पाण्यावर खर्च करावे लागत आहेत.

पाणीटंचाईमुळे दिव्यात टँकरमाफियांचे प्रस्थ मात्र फोफावले आहे. विशेष म्हणजे, एकीकडे नागरिकांना नळाद्वारे पुरेसे पाणी मिळत नसले तरी, टँकरमाफिया मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलवाहिन्यांतून खुलेआम पाणीचोरी करून त्याची विक्री करत आहेत. हेच पाणी दिवावासीयांना ५०० लिटरमागे २५० रुपये या दराने विकले जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या दिवा शहरात तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. शहरात घरोघरी नळ जोडण्यात असल्या तरी, त्याद्वारे सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. परिसरात असंख्य बेकायदा बांधकामे उभी करण्यात आली असून या इमारतींमध्ये पालिकेच्याच जलवाहिन्यांतून अनधिकृत नळजोडणी करून पाणीपुरठा केला जात आहे. अशा नळजोडण्यांवर पालिकेकडून कारवाई केली जात असली तरी, त्याचा पुरता बंदोबस्त करणे शक्य झालेले नाही. या अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाण्याचा दाब कमी होत असल्यामुळे सर्वच नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांना टँकरचे पाणी खरेदी करावे लागत आहे. या ठिकाणी दर एक हजार लिटरला पाचशे रुपये या दराने पाणीविक्री सुरू आहे. पाच ते सहा जणांच्या कुटुंबाची रोजची पाण्याची गरज साधारण पाचशे लिटर इतकी असते. हा हिशोब करता प्रत्येक कुटुंबाला दिवसाला २५० रुपये या दराने महिन्याला साडेसहा ते सात हजार रुपये पाण्यावर खर्च करावा लागत आहे.

दिवा शहरात सात लाखांहून अधिक नागरिक वास्तव्य करत असून दररोज २७ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता या भागाला आहे. सद्य:स्थितीत दररोज १० ते ११ दशलक्ष लिटर इतकाच पाण्याचा पुरवठा दिवा शहराला होत असल्याचे ठाणे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. सद्य:स्थितीत दिवा आणि आसपासच्या परिसरात १२५हून अधिक टँकरपुरवठा करणारे सक्रिय आहेत. यापैकी काही जण आगासन निळजे गावातील एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणी चोरून त्याची विक्री इमारती आणि चाळींना करतात, अशी माहिती पुढे येऊ लागली आहे.

महापालिकेकडून पाणीपट्टी आकारणी

दिवा शहराला आगासन निळजे गावातील एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो. या वाहिन्याद्वारे दिवा शहरातील काही संकुलांमध्ये अधिकृत नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र नळाला अधिक वेळा पाणी येत नसून महापालिका मात्र मासिक १५० ते २०० रुपये पाणीपट्टी आकारणी करत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

पाणीचोरी अशी होते

आगासन गाव आणि दातिवली रेल्वे फाटकादरम्यान एमआयीडीसीची जलवाहिनी आहे. या जलवाहिनींवरील अनधिकृतपणे जोडणीतून जवळच असणाऱ्या टाकीत पाणी उपसा यंत्राद्वारे चढवले जाते. या ठिकाणीच एक मीटर आणि जनित्र यंत्र असून त्याद्वारे टाकीतून पाणी वाहनांतील प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये चढवले जाते व विकले जाते.

पाण्याचा दर्जा निकृष्ट

ज्या ठिकाणाहून पाण्याची चोरी होते त्या आगासन गाव आणि दातिवली रेल्वे फाटकादरम्यान टँकरमाफियांकडून कूपनलिकाही खोदण्यात आल्या आहेत. या कूपनलिकांद्वारे पाणी टँकरमध्ये चढवून त्याचा पुरवठा चाळींमध्ये केला जातो. मात्र कूपनलिकांद्वारे मिळणारे पाणी निकृष्ट दर्जाचे असून यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

दिवा भागातील एमआयडीसीच्या जलवाहिन्यांमधून पाणीचोरी करणाऱ्या टँकर माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवा आणि मुंब्रा परिसरातील पाणीचोरी करणाऱ्या संशयितांची तपासणी सुरू आहे.

– अर्जुन आहिरे, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका

पाणीचोरीच्या प्रकारामुळे सर्वसामान्य दिवेकर नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे त्यांना निकृष्ट दर्जाचे पाणी विकत घ्यावे लागत असून पाण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे.

– विजय भोईर,  संस्थापक, ‘जागा हो दिवेकर’ संस्था

First Published on April 24, 2019 2:52 am

Web Title: due to inadequate water supply diva residents depend on tanker water
Next Stories
1 नोकरीच्या बहाण्याने ४० जणांना गंडा
2 डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या
3 मॉडेलिंगसाठी इच्छुक तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार, भाईंदरमधील घटना
Just Now!
X